
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाबाबत सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बाबत एफआयआर (FIR) दाखल केल्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. बिहार पोलीस सध्या मुंबईमध्ये असून प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मोठ्या घडामोडीत आता सुशांतचे ‘आर्थिक व्यवहार’ लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याआधी सुशांतच्या वडिलांनीही सुशांतच्या बँक खात्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. आता रिपब्लिक टीव्हीने सुशांतच्या बँक स्टेटमेन्टबाबतचा पुरावा सादर केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
रिपब्लिक टीव्हीद्वारे मिळवलेल्या सुशांतच्या बँक रेकॉर्डमध्ये गेल्या वर्षभरातील व्यवहार हे सुशांतच्या आयुष्यात रियाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात. सुशांतच्या खात्यामधून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासाठी विमानाचे तिकीट, हॉटेल स्टे, ट्युशन फी, शॉपिंग आणि इतरही अनेक गोष्टींवर पैसे खर्च केल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये जवळजवळ 4 कोटी, 62 लाख रुपये सुशांतच्या बँक खात्यात शिल्लक होते. हे पैसे फेब्रुवारी 2020 पर्यंत 1 कोटी रुपयांपेक्षा कमी झाले.
यामध्ये 81 हजार शौविकच्या विमान तिकिटासाठी, त्यानंतर रियाचे केस, मेकअप, शॉपिंग, पार्लर खर्च, तिच्या वैयक्तिक खर्चासाठी 1 लाखांहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. अशाप्रकारे सुशांतच्या बँक स्टेटमेंटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुशांतच्या वडिलांनी रियाविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्येही मटाले आहे की, ‘माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंट मधून असे समोर आले आहे की, गेल्या 1 वर्षात माझ्या मुलाच्या बँक खात्यात सुमारे 17 कोटी रुपये जमा झाले होते. या कालावधीत या खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये काढले गेले आहेत. ज्या ठिकाणी हे पैसे हस्तांतरित केले गेले त्या खात्याशी माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता. तरी, माझ्या मुलाच्या सर्व बँक खात्यांची चौकशी झाली पाहिजे. रियाने या बँक खात्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे किती पैसे घेतले आहेत? तसेच आपले कुटुंबीय व सहकार्यांसह सुशांतला फसवले आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे.’ (हेही वाचा: सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी उपस्थित केले 7 प्रश्न; रिया चक्रवर्तीने लॅपटॉप, दागदागिने, क्रेडिट कार्ड नेले, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, बिहार पोलिसांकडून अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर काहीजणांविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत, अंमलबजावणी संचालनालय (ED) मागविली आहे. या प्रकरणातील संभाव्य मनी लॉन्ड्रिंग अँगलची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.