Sushant Singh Rajput and Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात आता नवे वळण आले आहे. मुंबई पोलिस गेल्या दीड महिन्यांपासून दिवंगत सुशांतच्या मृत्युच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. आता सुशांतचे वडील केके सिंह यांनी सुशांतची कथित मैत्रीण रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिच्या कुटुंबातील 3 सदस्य आणि दोन व्यवस्थापकांविरूद्ध पटनातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती हिच्याच्याविरूद्ध सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवूत्त करणे, फसवणूकीसह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पाटणा महानिरीक्षक संजय सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

सुशांतच्या वडिलांनी आपल्या एफआयआरमध्ये काही प्रश्न उपस्थित करत त्याबाबतची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

> 2019 पूर्वी, माझा मुलगा सुशांत सिंह कोणत्याही मानसिक आजाराशी झगडत नव्हता. मात्र रियाच्या संपर्कात आल्यावर अचानक काय झाले? सुशांत सिंहला नक्की काय मानसिक समस्या होती याची चौकशी व्हावी.

> जर तो मानसिक आजारावरील उपचार घेत होता, तर आमच्याकडून किंवा आमच्या कुटुंबातील सदस्यांकडून याबद्दल कोणतीही लेखी किंवा तोंडी परवानगी का घेतली गेली नाही? जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकरित्या आजारी असते तेव्हा त्याचे सर्व अधिकार त्याच्या कुटूंबाकडे असतात, याची चौकशी व्हायला हवी.

> मला वाटते की, ज्या-ज्या डॉक्टरांनी रियाच्या सांगण्यावरून माझ्या मुलावर उपचार केले ते सर्व या कटात सामील होते. त्यांनी कोणते उपचार केले याची चौकशी झाली पाहिजे तसेच माझ्या मुलाला कोणती औषधे दिली गेली, हे देखील तपासावे.

पहा ट्वीट- 

> माझ्या मुलाची मानसिक स्थिती नाजूक आहे, हे जेव्हा रियाला कळते तेव्हा अशा परिस्थितीत तिने त्याच्यावर योग्य उपचार करायला हवे होते. मात्र तिने ते केले नाही, त्याच्या सर्व उपचारांचे कागदपत्र ती सोबत घेऊन निघून गेली. माझ्या मुलाला त्या नाजूक परिस्थितीत एकटे सोडले आणि सर्व प्रकारे त्याच्या संपर्क तोडल्यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केली.

> माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंट मधून असे समोर आले आहे की, गेल्या 1 वर्षात माझ्या मुलाच्या बँक खात्यात सुमारे 17 कोटी रुपये जमा झाले होते. या कालावधीत या खात्यातून सुमारे 15 कोटी रुपये काढले गेले आहेत. ज्या ठिकाणी हे पैसे हस्तांतरित केले गेले त्या खात्याशी माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता. तरी, माझ्या मुलाच्या सर्व बँक खात्यांची चौकशी झाली पाहिजे. रियाने या बँक खात्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे किती पैसे घेतले आहेत? तसेच आपले कुटुंबीय व सहकार्‍यांसह सुशांतला फसवले आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे.

> माझा मुलगा सुशांतला फिल्म लाइन सोडून आपला मित्र महेश याच्याबरोबर केरळच्या कुर्ग येथे सेंद्रिय शेती करायची होती, ज्यासाठी तो जमीन शोधत होता. रियाला जेव्हा हे कळले तेव्हा तिने सुशांतला धमकी दिली की, ती सुशांतच्या उपचारांबद्दलचे सर्व कागदपत्र माध्यमांमध्ये प्रकाशित करेल. पण जेव्हा सुशांतने त्याला विरोध केला तेव्हा रियाला वाटले की सुशांतचा आता तिला काही उपयोग होणार नाही. यानंतर सुशांतच्या घरातून रिया लॅपटॉप, दागदागिने, क्रेडिट कार्ड, उपचारांची कागदपत्रे, पिन क्रमांक, पासवर्ड घेऊन बाहेर पडली, या गोष्टीचीही चौकशी करावी.

> या प्रकरणाआधी सुशांतचे अभिनय जगतात नाव होते, मात्र रियाच्या आगमनानंतर सुशांतचे चित्रपट फार कमी का झाले? याची चौकशी झाली पाहिजे. (हेही वाचा: सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरूद्ध दाखल केला FIR; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप)

सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती हिची दोनदा चौकशी केली आहे. एकदा तिची सुमारे 11 तास चौकशी करण्यात आली. दुसऱ्या वेळच्या चौकशी दरम्यान रियाने आर्थिक व्यवहाराची माहिती दिली नाही. रिया सुशांतच्या तीनपैकी दोन कंपन्यांमध्ये संचालक होती. रियाचा भाऊ शोविज चक्रवर्ती हा एका कंपनीत अतिरिक्त संचालक होता. सुशांतने आपल्या कमाईचा बराचसा भाग या तिन्ही कंपन्यांमध्ये गुंतविला होता.

मुंबई पोलिसांनी सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 39 जणांचे जबाब नोंदवले आहेत. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. मात्र घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. परंतु काही लोक असे मानतात की, सुशांत बाहेरील असल्याने इंडस्ट्रीमधील काही लोकांनी त्याचे करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला. यालाच कंटाळून त्याने आत्महत्या केली. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी केली. यापूर्वी सोमवारी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात महेश भट्ट यांची सुमारे दोन तास चौकशी केली गेली.