14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. सुरुवातीच्या तपासात सुशांतने आत्महत्या (Suicide) केल्याचे निष्पन्न झाले होते, मात्र सुशांतच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की सुशांतचा खून झाला आहे. मुंबई पोलिस गेल्या दीड महिन्यांपासून दिवंगत सुशांतच्या मृत्युच्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरूद्ध, पटनातील राजीवनगर पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. रियावर, सुशांतला प्रेमात फसवून पैसे लाटणे व आत्महत्येस प्रवृत्त (Abetment of Suicide) केल्याचा आरोप आहे.
पहा एएनआय ट्वीट -
FIR registered against actor Rhea Chakraborty under various sections, including abetment of suicide, on the complaint of #SushantSinghRajput's father: Sanjay Singh, Inspector General, Patna Central Zone
— ANI (@ANI) July 28, 2020
संजय सिंह, महानिरीक्षक, पाटणा यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रकरण क्रमांक 241/20 आहे व आता पाटण्यातील चार पोलिसांची टीम मुंबईत पोहोचली आहे. सुशांतच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी व्हायला हवी असे सुशांतचे चाहते आणि इतर अनेक सेलिब्रिटींचे म्हणणे आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील ट्वीट करत हीच मागणी केली होती. मात्र सुशांतच्या चाहत्यांनी घडलेल्या गोष्टीमध्ये रियाचाही सहभाग असल्याचा म्हटले होते. आता सुशांतच्या कुटुंबाने रियाविरुद्ध FIR दाखल केला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची सुमारे 11 तास चौकशी केली होती. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता यांची तब्बल तीन तास चौकशी)
रियाने जाणूनबुजून सुशांतला फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व त्याच्याकडून पैसे लाटले आणि नंतर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे आरोप रियावर ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत घडलेल्या प्रकरणाबाबत सुशांतचे कुटुंब शांत होते. सुशांतची बहिण श्वेता कीर्ती हिने, मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर पुढे काय करायचे हे ठरवता येईल असे सांगितले आहे. परंतु आता कुटुंबाने रियावर गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे.