सुशांत सिंह राजपूत याच्या नावे ओळखला जाणार बिहारच्या पूर्णिया मधील रस्ता आणि चौक; पहा Photos
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आता एक महिना पूर्ण होत आला आहे. दरम्यान मुंबई पोलिस (Mumbai Police) सध्या सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्याच्याशी संबंधित लोकांना जबाबही नोंदवला जात आहे. तर एकीकडे सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सोशल मीडियावरुन केली जात आहे. हे सर्व सुरु असताना सुशांतच्या कार्याला सन्मानित करण्यासाठी बिहारच्या (Bihar) पूर्णिया (Purnea) मधील रस्त्याला आणि चौकाला सुशांत सिंह राजपूत याचे नाव देण्यात आले आहे. सुशांत हा मुळचा बिहारचा होता. त्यामुळे बिहारमधील पूर्णिया मार्गाला आणि चौकाला त्याचे नाव देण्यात आले आहे. याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या निर्णयामुळे सुशांतच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. अशातच पूर्णिया येथील एका रस्त्याला आणि चौकाला सुशांतचे नाव देण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर तिथील नगर निगमच्या फोर्ड कंपनी चौकाचे नाव बदलून 'सुशांत सिंह राजपूत पथ' आणि 'सुशांत सिंह राजपूत चौक' असे ठेवण्यात आले. पूर्णियाचे महापौर सविता देवी यांच्या हस्ते या चौकाचे आणि रस्त्याच्या नवीन नावाचे उद्घाटन करण्यात आले. याचे फोटोज समोर आले आहेत. (Dil Bechara Title Track: सुशांत सिंह राजपूत याच्या 'दिल बेचारा' सिनेमाचे पहिले गाणे रसिकांच्या भेटीला!, Watch Video)

पहा फोटोज:

सुशांत सिंह राजपूत याच्या मनाला चटका लावणाऱ्या निधनानंतर बॉलिवूडमधील वातावरणही ढवळून निघाले आहे. तसंच बॉलिवूड मधील बडे निर्माते, दिग्दर्शक यांची नावे नेपोटिज्मच्या मुद्द्यावरुन समोर येत आहेत. तर या प्रकरणी सलमान खान, करण जोहर यांच्यासह अनेकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण नेमके कोणते वळण घेते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.