Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण 'सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार दिली नव्हती'
(Photo Credits: Mumbai Police)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या वडिलांनी केलेला दावा मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police) फेटाळला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra Police Station) कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार 25 फेब्रुवारी या दिवशी दिली नव्हती, असे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी दावा केला होता की, आपण सुशांत सिंह प्रकरणात 25 फेब्रुवारी या दिवशीच मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. ही तक्रार आपण वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही. त्यामुळे मग आपण पाटणा पोलिसांमध्ये पुढील तक्रार दाखल केली, असे सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी म्हटले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. बॉलिवूडमधील एक उमलता, तरुण आणि यशाकडे वाटचाल करणारा अभिनेता अशी त्याची ओळख होती. अत्यंत तरुण वयात आणि अभिनयासारख्या अत्यंत बेभरवशाच्या क्षेत्रात सुशांतने स्वकष्टाने जम बसविला होता. (हेही वाचा, मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे पटना पोलिसांत FIR दाखल केली; सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांचे वक्तव्य (Watch Video))

दरम्यान, सुशांतने अचानक आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्याने आत्महत्या का केली असावी या कारणांचा शोध सुरु आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, सुशांत सिंह याच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर बिहार पोलिसही या प्रकरणाचा तपास करु लागले आहेत. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्तेवरुन महाराष्ट्र पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे.