'बालिका वधू', 'परदेश में है मेरा दिल', 'एक था राजा एक थी राणी' यासारख्या टीव्ही कार्यक्रमांव्यतिरिक्त 'बधाई हो' (Badhaai Ho) सारख्या अनेक चित्रपटांत काम केलेल्या, जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना मंगळवारी ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुंबईच्या यारी रोडवरील एका घरात राहणाऱ्या 75 वर्षीय सुरेखा सीकरी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जवळच्या क्रिटी केयर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्या आवश्यक चाचण्या व तपासण्या केल्या जात आहेत.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. सुरेखा सिक्री यांना यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता, ज्यामुळे त्यांना अर्धांगवायूच्या समस्येला तोंड द्यावे लागले. शूटिंग दरम्यान त्या पडल्या होत्या, मात्र नंतर ती हळू हळू त्या बऱ्या होत गेल्या. त्यांच्यासोबत काळजी घेण्यासाठी घरी एक नर्सही होती.
नर्सने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास सुरेखा रस घेत होत्या, त्यावेळी त्यांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर नर्सने तातडीने सुरेखा यांना जवळच्या क्रिटी केयर रुग्णालयात नेले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नर्सने पुढे सांगितले, इतर रुग्णालये जास्त शुल्क आकारत असल्याने त्यांना इतर कोणत्याही रुग्णालयात दाखल केले नाही, सध्या त्यांच्याजवळ तितके पैसे नाहीत. आता सुरेखा सिक्री यांनी बॉलिवूडमधील लोकांना आर्थिक मदतीची याचना केली आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: Kangana Ranaut To Anil Deshmukh: माझी ड्रग्ज टेस्ट करा,चुक आढळली तर मुंंबई कायमची सोडेन- कंंगना रनौत)
दरम्यान, सुरेखा सिक्री यांनी 'तमस', 'बधाई हो', 'मम्मो', 'नजर', 'सलीम लंगडे पे मत रो', 'झुबैदा', 'काली सलवार', 'रेनकोट', 'हमको दीवाना कर गये' अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. सुरेखा सिक्री लॉक डाऊनमध्ये घरातच होत्या आणि बर्याच दिवसांपासून त्या शुटिंग करत नव्हत्या. एका मुलाखतीत सुरेखा सिक्री यांनी सांगितले की, 'बधाई हो' चित्रपटाच्या रिलीजच्या अवघ्या एका महिन्या आधीच त्यांना स्ट्रोक आला होता.