Actor Vijay Babu (PC - Facebook)

Actor Vijay Babu Arrested: मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Actor Vijay Babu) ला लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कोची येथील एका अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. एर्नाकुलम दक्षिण पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर असताना विजय बाबूला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाला 3 जुलैपर्यंत विजय बाबूची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. विजय बाबूवर या वर्षाच्या सुरुवातीला महिलेने आरोप केले होते. पीडितेने सांगितले की, कोची येथील एका फ्लॅटमध्ये अभिनेत्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने विजय बाबूने तिचे लैंगिक शोषण केले.

एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, जो 22 एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. यापूर्वी 22 जून रोजी त्याला केरळ उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळाला होता. अहवालानुसार त्याला जामीन मंजूर झाला असला तरी त्याला या प्रकरणात तपास पथकाला सहकार्य करावे लागणार आहे. (हेही वाचा - Money Laundering Case: जॅकलीन फर्नांडिस ईडीसमोर हजर, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुन्हा चौकशी)

वृत्तानुसार, त्यावेळी विजय बाबू दुबईला पळून गेला होता. या महिन्याच्या सुरुवातीला तो परतला. फेसबुक लाईव्ह दरम्यान पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोपही अभिनेत्यावर आहे.

Onmanorama च्या अहवालानुसार विजय म्हणाला की, तो प्रत्यक्षात पीडित आहे आणि तो मानहानीचा दावा दाखल करणार आहे. तक्रारदाराचे नाव उघड केल्यानंतर परिणाम भोगण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले. विजयने तक्रारदाराला सहजासहजी जाऊ देणार नसल्याचे म्हटले आहे.

या आरोपांनंतर विजय यांना द असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (AMMA) च्या कार्यकारी समितीच्या पदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले. एएमएमचे प्रवक्ते एडावेला बाबू यांनी सांगितलं की, न्यायालयाच्या आदेशानुसार ते विजय बाबूवर कारवाई करणार आहेत.