Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या काळात रिअल हिरो म्हणून समोर आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सतत गरजूंना मदत करत आहे. याआधी त्याने लॉक डाऊन दरम्यान अनेकांना आपल्या घरी पोहोचवले होते. तसेच अनेकांना घरे मिळवून दिली होती, कित्येकांच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले होते. आता सोनू सूद गरजू लोकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कोविड संकटात गरजूंना मदत करण्यासाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे, ज्या अंतर्गत या साथीच्या रोगाच्या काळात ज्या लोकांनी आपली नोकरी गमावलेली आहे त्यांना मोफत ई-रिक्षा (E-Rickshaws) दिली जाणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्याने रविवारी सोशल मिडियावर आपल्या या नवीन उपक्रमाबाबत माहिती दिली. याचे नाव, 'खुद कमाओ घर चलाओ' (Khud Kamao Ghar Chalaao) असे आहे. याबाबत सोनू सूद म्हणाला, ‘लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळेच मला त्यांच्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा मिळाली. माझा विश्वास आहे की पैसे किंवा वस्तूंच्या मदतीपेक्षा नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणे अधिक महत्वाचे आहे. मला खात्री आहे की हा उपक्रम गरजूंना पुन्हा स्वावलंबी करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करेल.’

सध्या अर्थव्यवस्थेचे भरपूर नुकसान झाले असल्याने, सोनू सूदचा हा प्रकल्प रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असेल. श्याम स्टील इंडिया आणि सोनू सूद यांनी एकत्र मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. या ई-रिक्षामधून किराणा, डेअरी उत्पादने इ. गोष्टींची डिलिव्हरी करणे शक्य होणार आहे. या मोठ्या संकटात अशा प्रकारच्या मदतीमुळे गरजूंना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळणार आहे. (हेही वाचा: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे)

दरम्यान, या वर्षाच्या सुरूवातीस, सोनू सूदने प्रवासी रोजगार अ‍ॅप लाँच केले होते, ज्याद्वारे कोरोना साथीच्या आजारामुळे नोकरी गमावलेल्या लोकांसाठी 50,000 हून अधिक रोजगार निर्माण केले गेले होते. तसेच नुकतेच सोनू सूदने गरजूंच्या मदतीसाठी 10 कोटी रुपये उभे करण्यासाठी आपल्या मुंबईमधील आठ मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.