लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी राजकीय पक्षांकडून जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अशामध्ये आयाराम- गयारामांसोबतच अनेक राजकीय पक्षांकडून कलाकार उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले जात आहे. अशामध्येच एक नाव चर्चेमध्ये होतं ते म्हणजे बॉलिवूडचा दबंगस्टार 'सलमान खान'(Salman Khan). मात्र सलमान खानने आज आपण आगामी लोकसभेच्या रिंगणात ना उमेदवार ना प्रचारक म्हणून उतरणार असल्याची माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींसोबत असलेली जवळीक तसेच सलमानची बहीण अर्पिता खान (Arpita Khan Sharma) हिच्या सासरी असलेली राजकीय पार्श्वभूमी पाहता सलमान खान यंदा निवडणूक लढणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज त्यांना खुद्द सलमान खाननेच पूर्ण विराम लावला आहे.
सलमान खान ट्विट
Contrary to the rumours I am not contesting elections nor campaigning for any political party..
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 21, 2019
यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शत्रुघ्न सिन्हा , 'जयकांत शिक्रे' फेम अभिनेता प्रकाश राज लोकसभा निवडणूक 2019 लढणार आहेत. तर मराठी कलाकार डॉ अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. दिल्लीच्या चांदणीचौक भागातून अक्षय कुमार लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतो अशी चर्चादेखील रंगत आहे. मात्र अद्याप अक्षय कुमारने याबाबत खुलासा केलेला नाही.
सलमान खान सध्या भारत आणि दबंग 3 या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच संजय लीला भंसाळी यांच्या आगामी इन्शाअल्लाह या सिनेमात आलिया भट्ट सोबत दिसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.