Reliance-Disney Deal: मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि डिस्ने यांच्यात करार; जन्माला येणार देशातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी
Mukesh Ambani | (File Image)

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) मनोरंजन आणि मीडिया मार्केटमध्ये आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी लंडनमध्ये एक मोठा करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्नेमध्ये (Disney Star) भारतातील त्यांच्या मीडिया ऑपरेशन्सच्या विलीनीकरणासाठी बंधनकारक नसलेला करार झाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या एका वृत्तात ही माहिती दिली आहे. यामध्ये रिलायन्सला बहुसंख्य हिस्सा मिळेल. म्हणजेच विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या नवीन कंपनीचे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्याकडे असतील.

नव्या कंपनीत रिलायन्सकडे 51 टक्के आणि डिस्नेकडे 49 टक्के हिस्सेदारी असेल. हा करार फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिस्नेचे कार्यकारी केविन मेयर आणि रिलायन्सचे मनोज मोदी या डीलमध्ये सहभागी होते. लंडनमध्ये हा करार अंतिम झाला आहे. हे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी देशातील सर्वात मोठी मनोरंजन आणि मीडिया कंपन्यांपैकी एक तयार होईल.

नवीन कंपनी झी एंटरटेनमेंट आणि सोनी सारख्या मोठ्या टीव्ही प्लेयर्सशी थेट स्पर्धा करेल आणि नंतर नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम सारख्या खेळाडूंसोबत स्ट्रीमिंगमध्येही स्पर्धेत उतरेल. या विलीनीकरणात जिओ सिनेमाचाही समावेश करण्यात आला आहे. त्याच्याकडे आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चे ऑनलाइन हक्क आहेत. यापूर्वी हे अधिकार डिस्ने हॉटस्टारकडे होते. या क्षेत्रात अंबानींना केवळ डिस्नेकडूनच स्पर्धा होत होती. मात्र आयपीएलचे ऑनलाइन हक्क गेल्यानंतर डिस्ने हॉटस्टारचे वापरकर्ते कमी होऊ लागले. त्यामुळे हा करार डिस्नेसाठी फायदेशीर ठरू शकतो. (हेही वाचा: Year Ender 2023: यंदा 'अॅनिमल' ते 'पठाण' पर्यंत यूट्यूबवर 'या' चित्रपटांचा ट्रेलर सर्वाधिक पाहण्यात आला, वाचा सविस्तर)

दोन्ही कंपन्या सुमारे $1-1.5 अब्ज गुंतवणूक करू शकतात. रिपोर्टनुसार, रिलायन्सची उपकंपनी Viacom 18 ची स्टेप डाउन उपकंपनी तयार करण्याची योजना आहे. या अंतर्गत स्टॉक स्वॅपद्वारे स्टार इंडियाचे विलीनीकरण केले जाईल.