BMC ने विनंती करूनही रेखा यांचा कोरोना विषाणू चाचणी करून घेण्यास नकार; बीएमसीच्या टीमला दिली ‘अशी’ वागणूक
रेखा (Photo Credits : Facebook)

महाराष्ट्रामधील कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग आता अनेक सेलेब्जच्या घरापर्यंत पोहोचला आहे. सध्या अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील 4 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याआधी अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आली होती. सध्या रेखा यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिका मारला असून, त्या घरातच आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र आता बातमी मिळत आहे की, रेखा यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घेण्यास नकार दिला आहे. बीएमसी (BMC) ने कैक वेळा विनंती करूनही रेखा यांनी आपली कोरोना विषाणू चाचणी करून घेतली नाही.

रेखा यांचा बांद्रा परिसरात ‘सी स्प्रिंग्ज’ नावाचा बंगला आहे. इथे साधारण दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात व त्यातील एकाlला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि बीएमसीने परिसर पूर्णपणे स्वच्छ केला आहे. इंडिया टीव्हीच्या अहवालानुसार रेखा, त्यांची मॅनेजर फरजाना, इतर तीन कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांची कोरोनाची चाचणी होणे गरजेचे होते. यासाठी बीएमसीचे अधिकारी रेखाच्या घरी पोहोचले व त्यांनी बेल वाजवली. मात्र आधी दरवाजामागून कोणतेही उत्तर आले नाही.

थोड्या वेळाने, फरजाना दरवाजा न उघडताच दाराच्या मागूनच त्यांच्याशी बोलली आणि तिने अधिकाऱ्यांना तिच्या फोनवर कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर मात्र बीएमसी टीमकडे परतण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. नंतर बीएमसी एच पश्चिम प्रभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय फुडे यांनी सांगितले की, त्यांनी  फरझानाने दिलेल्या नंबरवर कॉल केला असता, रेखा ठीक असल्याचे सांगण्यात आले व ती कोणाच्याही संपर्कात आली नसल्याने कोरोना चाचणी करून घेण्यासाठी नकार देण्यात आला. (हेही वाचा: सारा अली खान हिच्या ड्रायव्हरला कोरोना व्हायरसची लागण; सारा सह कुटुंबियांचे रिपोर्ट्स निगेटीव्ह)

बीएमसीच्या नियमानुसार, घरात कोणाचीही कोरोना चाचणी सकारात्मक आल्यास, इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. मात्र रेखाने यासाठी नकार दिला. त्यानंतर जेव्हा बीएमसीचे लोक रेखाचे घर स्वच्छ करण्यास गेले, तेव्हा पुन्हा दरवाजा उघडला गेला नाही. अखेरीस त्यांनी फक्त घराबाहेर जंतुनाशक फवारणी केली व ते परत आले.