Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

सध्या बॉलिवूडचे खराब दिवस चालू आहेत. एकीकडे बॉलीवूडचे मोठ मोठे सिनेमे फ्लॉप होत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीमुळे कलाकार आणि चित्रपट निर्माते नाराज झाले आहेत. याआधी सुपरस्टार अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अनेक चित्रपट सातत्याने फ्लॉप ठरले आहेत व आता त्याचा आगामी चित्रपट 'राम सेतू' (Ram Setu) रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या बॉलिवूड चित्रपटावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) संतापले आहेत.

'राम सेतू' चित्रपटाच्या पोस्टरवर सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत वापरण्यात आली आहे. यावर भाजप नेते संतापले आहेत. स्वामी यांनी यापूर्वी अक्षय कुमारवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. आता त्यांनी आपल्या वकिलामार्फत अक्षयसह चित्रपटाशी संबंधित इतर 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, 'मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोटे आणि गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी मी अक्षय कुमार आणि राम सेतूशी संबंधित 8 लोकांविरुद्ध वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’ (हेही वाचा: खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कॉमेडियन राजू श्रीवास्तवचे कुटुंब संतापले; सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरून हटवले 42 पेज)

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, जो राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचा तपास करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा देखील दिसणार आहेत. हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित आहे आणि 24 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.