Actress Meera Chopra (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण (Covid-19 Vaccination) बंद केले आहे. असे असूनही, मुंबईजवळील ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझामधील कोरोना हॉस्पिटलमध्ये एका अभिनेत्रीला लस देण्यात आली आहे. मीरा चोप्रा (Meera Chopra) असे या अभिनेत्रीचे नाव असून ती प्रियंका चोप्राची बहिण आहे. या अभिनेत्रीने स्वतः ट्विट करून लस घेतल्याविषयी माहिती दिली होती. 36 वर्षीय अभिनेत्री मीरा चोप्राने सुपरव्हायझर असल्याचे सांगत बनावट ओळखपत्राद्वारे आरोग्य कर्मचार्‍यांच्या हक्काची लस घेतली. या घटनेमुळे ठाणे पालिकेत कंत्राटावर कर्मचारी उपलब्ध करून देणारी कंपनी अडचणीत आली आहे.

ठाण्यासह राज्यात लसीची कमतरता लक्षात घेता 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीचा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. अशात तामिळ आणि तेलगू चित्रपटांची अभिनेत्री मीरा चोप्रावर आरोप आहे की, तिने ठाणे येथील आरोग्य सेवा केंद्राचे बनावट ओळखपत्र बनवून लस घेतली. हा आरोप भाजप नेते मनोहर डुंबरे, निरंजन डावखरे यांनी केला आहे. डुंबरे यांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निरंजन डावखरे यांनी ट्वीटद्वारे अभिनेत्रीचे आय-कार्ड शेअर केले आहे आणि असा सवाल केला आहे की, इतक्या मोठ्या सेलिब्रिटीला फ्रंट लाइन वर्कर म्हणून काम करण्याची काय गरज आहे?

जेव्हा लसीकरणाचा हा वाद वाढू लागला, तेव्हा अभिनेत्री मीरा चोप्राने तिचे ट्विट सोशल मीडियावरून डिलीट केले. आता याबाबत तिने स्पष्टीकरण दिले आहे की, 'आपल्या सर्वांनाच लस हवी आहे व सर्वजण त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे, मीही माझ्या ओळखीच्या लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला आणि 1 महिन्यानंतर माझी नोंदणी झाली.' (हेही वाचा: मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू याची पत्नी कादंबरी यांचं कोरोनामुळे निधन)

ती पुढे म्हणते. ‘मला फक्त माझे आधार कार्ड पाठविण्यास सांगण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले आधार कार्ड माझे नाही. आधार कार्डद्वारे माझी नोंदणी झाली आहे आणि तोच माझा आयडी आहे. जर तुमच्या आयडीवर तुमची सही नसेल तर तो वैध मानला जात नाही. मीदेखील तो बनावट आयडी पाहिला आहे. मी अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नाही. जर असा कोणता खोटा आयडी तयार केला असेल तर, मला स्वत: ला जाणून घ्यायचे आहे की तो कधी आणि कसा बनवला गेला.’