मराठी विनोदी अभिनेता भूषण कडू याची पत्नी कादंबरी यांचं कोरोनामुळे निधन
Bhushan Kadu wife Kadambari dies due to Covid 19 (Photo Credits: Facebook)

मराठी विनोदी अभिनेता आणि बिग बॉस 1 फेम भूषण कडू (Bhushan Kadu) याची पत्नी कादंबरी (Kadambari) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी कादंबरी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. त्या 39 वर्षांच्या होत्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भूषणच्या जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला कादंबरी यांना ठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. यामुळे भूषणसह संपूर्ण कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कादंबरी या भूषणच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांना 7 वर्षांचा मुलगा असून प्रकिर्थ कडू असं त्याचं नाव आहे. बिग बॉस 1 मध्ये एका एपिसोडमध्ये त्यांना दाखवण्यात आलं होतं. त्यावेळेस मुलाला पाहून भावूक झालेला भूषण महाराष्ट्राने पाहिला होता.  (हे ही वाचा: अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे निधन)

भूषण कडू हा मराठी विनोदी अभिनेता असून त्याने अनेक कॉमेडी शोज, सिनेमे आणि नाटकांमध्ये काम केले आहे. बिग बॉस 1 मधील त्याच्या एन्ट्रीने प्रेक्षकांना भूषणची वेगळी बाजूही पाहता आली. अलिकडच्या काळात सोनी मराठी वरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कॉमेडी शो मध्ये त्याच्या विनोदी अभिनयाची चुणूक पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. त्यापूर्वी 'कॉमेडी एक्स्प्रेस', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या कॉमेडी शोज मधील त्याच्या अभिनयाने भूषणने प्रेक्षकांच्या मनांत स्थान निर्माण केले. 'एक डाव भटाचा', 'श्यामची मम्मी', 'भुताची शाळा', 'बत्ती गुल हाऊस फुल', 'मस्त चाललंय आमचं' यासारख्या कलाकृतींमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.