Prabhas Birthday Special: अबब! 60 कोटींचे घर, 5 लक्जरी कार्स; जाणून घ्या 'बाहुबली' फेम प्रभासची एकूण संपत्ती
Prabhas (Photo Credits: File Image)

बाहुबली (Baahubali) सीरीजमुळे दक्षिणात्य अभिनेता प्रभासचे (Prabhas) नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. एस एस राजामौली यांनी प्रभासला दिलेल्या ओळखीमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. आज प्रभास आपला 40 वा वाढदिवस साजरा करीत आहे. 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई इथे प्रभासचा जन्म झाला. तुम्हाला हे थोडे मजेशीर वाटेल पण प्रभासचे खरे नाव ‘वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपट्टी’ आहे. अभिनयाचे प्राथमिक धाड प्रभासला घरातच मिळाले होते. 2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईश्वर’ या तेलुगु सिनेमातून आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर आताच्या बाहुबली पर्यंत प्रभासने अतिशय दर्जेदार भूमिका केल्या.

प्रभासने बाहुबली 1 साठी 25 कोटी मानधन घेतले होते, मात्र साहो साठी त्याने तब्बल 100 कोटी घेतल्याचे बोलले जात आहे. बाहुबलीमुळे प्रभासला फक्त प्रसिद्धीच मिळाली नाही तर, देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यापैकी एक बनण्याचा मानही मिळाला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया प्रभासच्या संपत्तीवर

प्रभास सध्या 200 कोटींचा मालक आहे. यामध्ये त्याचे घर आणि त्याच्याकडे असणाऱ्या गाड्यांचा वाटा मोठा आहे. प्रभास 60 कोटींच्या फार्महाऊसमध्ये राहतो. हे फार्महाऊस त्याने हैद्राबाद येथे 2014 साली विकत घेतले होते. या फार्महाऊसच्या आत जिम, स्विमिंग पूल, थिएटर, स्पोर्ट्स एरिया आणि छोटा क्लब आहे.

प्रभासकडे पाच उत्तम गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत 30 लाख ते 8 कोटीपर्यंत आहे. प्रभासकडील सर्वात कमी किंमतीची कार स्कोडा सुपर्ब ही आहे. या गाडीची किंमत 30 लाख रुपये आहे. प्रभास जवळ असणारी सर्वात महागडी गाडी रॉयल रॉयस फॅंटम आहे. या कारची किंमत सुमारे 8 कोटी आहे. बाहुबलीच्या टिमने प्रभासला दीड कोटींचे जिमचे साहित्य भेट म्हणून दिले होते.

वेबसाइट फिनअॅपच्या (Finapp) मते, वर्ष 2018 मध्ये प्रभासची एकूण नेट वर्थ 160 कोटी रुपये होती. चित्रपटांच्या फीशिवाय, तो ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंटसाठी 2 कोटी रुपये घेतो. प्रभास महिंद्रा कंपनीचे वाहन महिंद्रा टीयूव्ही 300 चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. प्रभास हा देशातील सर्वात जास्त कर भरणाऱ्या लोकांपैकी एक आहे. 2016 मध्ये त्याने जवळजवळ 7 कोटी कर भरला होता. बाहुबली नंतर प्रभासच्या संपती मध्ये 65 टक्क्यांनी वाढ झाली.

आपल्या 16 वर्षांच्या अभिनयाच्या कारकीर्दीमध्ये प्रभासने फक्त 19 चित्रपटांमध्ये काम केले आहे. साहो हा प्रभासचा पहिला हिंदी चित्रपट आहे. स्वतःच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रभासने देश-विदेशातील तमाम प्रेक्षकांच्या काळजावर स्वतःचे असे वेगळे नाव कोरले आहे. भारतीयच नाही तर  इतर भाषिक लोकही आज प्रभासला ओळखतात आणि त्याचे चाहते आहेत. यातच प्रभासचे यश दिसून येते.