Poonam Pandey Defamation Lawsuit: बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) नुकतेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. पूनम पांडेच्या मृत्युच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता व सोशल मिडियावरही याची जोरदार चर्चा झाली. पूनमला तिच्या अत्यंत वाईट पब्लिसिटी स्टंटमुळे खूप ट्रोल करण्यात आले होते. मृत्युच्या बातमीनंतर पूनमने एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले होते की, तिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. परंतु आता पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे त्यांच्या या कृत्यामुळे अडचणीत सापडले आहेत.
अभिनेत्री पूनम पांडे आणि तिच्या पतीविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेने तिच्या मृत्यूची खोटी कथा रचल्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री आणि तिचा माजी पती सॅम बॉम्बे यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, फैजान अन्सारी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी पूनम पांडेवर तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून लाखो लोकांच्या भावना आणि विश्वासाशी छेडछाड करून, कर्करोगासारख्या आजाराच्या गंभीरतेची चेष्टा केल्याचा आरोप केला. पांडे आणि तिच्या माजी पतीला अटक करण्याचे आवाहनही तिने अधिकाऱ्यांना केले आहे.
पूनम पांडेने 2 फेब्रुवारीला तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या पोस्टद्वारे तिच्या 'मृत्यू'ची खोटी बातमी जाहीर केली होती. त्यानंतर एका दिवसांनी अभिनेत्रीने व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून ती जिवंत असल्याचे उघड केले. तिच्या मृत्यूच्या बातमीचा उद्देश गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता, असा युक्तिवाद तिने केला. मात्र अभिनेत्रीचा हा पब्लिसिटी स्टंट अनेकांना आवडला नाही. कंगना रणौत, करण कुंद्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर निशाणा साधला. (हेही वाचा: Malika Rajput Dies: गायिका, अभिनेत्री मल्लिका राजपूत चा राहत्या घरी आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय)
नंतर, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने देखील अभिनेत्री-मॉडेलविरूद्ध एफआयआरची मागणी केली आणि तिची कृती "घोर चुकीची" आणि "अस्वीकार्य" असल्याचे म्हटले. सिनेमा संघटनेने पूनमवरच नव्हे तर तिच्या मॅनेजरवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी प्रसिद्धी स्टंटचा निषेध केला आणि असा युक्तिवाद केला की "चित्रपट उद्योगातील कोणीही या पातळीवर जाऊ शकत नाही.