गेल्या काही वर्षांत शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कमबॅक चित्रपटाबाबत जितके कयास बांधले गेले असतील तितके इतर कोणत्याच अभिनेत्यासोबत घडले नसावे. 'झिरो' नंतर शाहरुख पडद्यावर दिसला नाही आणि आता किंग खान ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्याची चर्चा आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण पुन्हा एकदा शाहरुखसोबत दिसू शकते. अद्याप या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सध्या या चित्रपटासाठी शाहरुखने घेतलेल्या मानधनाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ताज्या मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानला 'पठाण' साठी निर्मात्यांनी 100 कोटी रुपये दिले आहेत. यासह शाहरुख खान बॉलीवूडचा सर्वात महागडा सुपरस्टार बनला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्टारपैकी एक आहे. परंतु आता आपण त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज याद्वारे लावू शकता की, आजही निर्माते शाहरुखला जितके हवे तितके मानधन देण्यास तयार आहेत. शाहरुख खानचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले नाहीत, परंतु असे असूनही यशराज फिल्म्सने त्याला ‘पठाण’साठी 100 कोटी रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबत त्याने आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार यांनाही मागे टाकले आहे. Spotboye ने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: KRK ने सांगितले अक्षय कुमार चे भविष्य, म्हणाला, 'पैसे कमावण्यासाठी अभिनेत्याकडे 2-3 वर्ष शिल्लक')
मात्र, शाहरूख खान किंवा चित्रपट निर्मात्यांपैकी कोणीही फीविषयी कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती दिली नाही. अशा परिस्थितीत या अहवालांची पुष्टी झाली नाही. शाहरुख खानने या चित्रपटासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. 'पठाण'साठी शाहरुखने बुर्ज खलिफासमोर जबरदस्त अॅक्शन सीन शूट केले असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, दुबई आणि इतर अनेक विदेशी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटासाठी विशाल-शेखरची जोडी संगीत देणार आहे, ज्यांनी आतापर्यंत शाहरुखसोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.