Pankaj Udhas Passes Away: दिग्गज गझल गायक, संगीतकार आणि पद्मश्री विजेते पंकज उदास यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सोमवारी (२६ फेब्रुवारी) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळ आजाराने त्रस्त होते. त्यांची कन्या नायब उदास यांनी त्यांच्या निधनाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. ज्यामुळे गझलप्रेमी आणि पंकज यांच्या चाहत्यांसह बॉलिवूड आणि संगितविश्वात शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने गझल 'उदास' झाली अशी भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त होत आहे. 'चिठ्ठी आयी है' 'चिठ्ठी आयी है', 'और आहिस्ता किजिए बातें',' जीये तो जीये कैसे' आणि 'ना कजरे की धार', यांसारख्या अनेक गझल त्यांनी गायल्या.
पंकज उदास यांच्या चाहत्यांना धक्का
गझल संगीताच्या क्षेत्रात पंकज उदास यांनी 1980 पासून आपल्या भावपूर्ण आवाजाने आणि भावपूर्ण सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भारताच्या संगीतविश्वाला समृद्ध करणाऱ्या एका प्रमुख व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने गायन क्षेत्रास आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. उधास यांच्या निधनाच्या बातमीने सहकारी कलाकार आणि चाहत्यांकडून सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले. (हेही वाचा, Poet Munawwar Rana Dies: ह्रदयविकाराच्या झटक्याने उर्दू कवी मुनव्वर राणा यांच निधन, वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
अल्बम आणि जाहीर कार्यक्रमांतून रसिक मंत्रमुग्ध
पंकज उदास यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये अनेक अल्बम रिलीज केले. ज्याला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गझल गायनाचे जाहीर कार्यक्रम हे देखील उदास यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. आपल्या गझल गायनाच्या जाहीर कार्यक्रमांतून त्यांनी देशविदेशातील श्रोत्यांना नेहमीच मंत्रमूग्ध केले. त्यांच्या कलात्मक पराक्रमाने आणि कलेबद्दलच्या समर्पणामुळे त्याला प्रतिष्ठित पद्मश्रीसह अनेक पुरस्कार मिळाले, जो भारतीय संगीताच्या क्षेत्रातील त्याच्या चिरस्थायी वारशाचा दाखला मानला जाईल. (हेही वाचा, Ameen Sayani Passes Away: अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन; भारतीय रेडिओवरील लोकप्रिय आवाज हरपला)
एक्स पोस्ट
Ghazal maestro Pankaj Udhas passes away at 72
Read @ANI Story | https://t.co/ESkP2h6XpS#PankajUdhas #Ghazal pic.twitter.com/FOXIWAy1bS
— ANI Digital (@ani_digital) February 26, 2024
पंकज उधास यांच्या निधनाने गझल संगीताच्या जगात एका युगाचा अंत झाला आहे. ज्याने जागतिक स्तरावर लाखो चाहत्यांनी जोपासलेला समृद्ध संगीताचा वारसा मागे सोडला आहे. पंकज उदास यांच्या निदनाचे वृत्त कळताच संगितविश्व आणि जगभरातील चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. केवळ संगीत क्षेत्रच नव्हे तर इतरही विविध क्षेत्रातील मान्यवर चाहते त्यांच्या जाण्यामुळे दु:ख व्यक्त करत आहेत. सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने इंस्टाग्रामवर म्हटले की, पंकज उदास यांच्या संगीताचा पिढ्यांवर होणारा परिणाम दिसून येतो. उदास यांच्या गाण्याचा आपल्या बालपणावर मोठा प्रभाव होता असे सांगत त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनीही पंकज उदास यांज्या जाण्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.