Mumbai Police Notice to Urfi Javed: भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत अभिनेत्रीवर जहरी शब्दांत टीका केली होती. उर्फीने चित्रा वाघ यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. आता मुंबई पोलिसांनी अभिनेत्री विरोधात सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार असून अभिनेत्रीला यासंदर्भात आज हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. (हेही वाचा - मॉडेल Uorfi Javed ने चित्रा वाघ यांच्याविरोधात दाखल केली तक्रार; धमकावल्याचा आरोप, रुपाली चाकणकरांचीही घेतली भेट)
दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या कारवाईच्या मागणीनंतर उर्फीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे धाव घेतली आहे. उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले की, उर्फीने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. वाघ यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी धमकावणे, इजा करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकिलाने फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्याची विनंती केली आहे.
उर्फी जावेदच्या वकिलाने सांगितले की, 'अभिनेत्रीने भाजप कार्यकर्ता चित्रा किशोर वाघ यांच्या विरोधात आयपीसीच्या विविध कलमांखाली धमकी देणे, सार्वजनिक इजा पोहोचवल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. याशिवाय सीआरपीसीच्या कलम 107 आणि 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती देखील करण्यात आली आहे.'
4 जानेवारी रोजी, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल ट्वीट्सची मालिका पोस्ट केली. यातील एका ट्विटरमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिलं होत की, 'अर्ध नग्न महिला रस्त्यावर मुक्तपणे फिरत आहेत. महिला आयोग स्वत:हून दखल का घेत नाही? हा विरोध उर्फीचा नसून सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने फिरण्याच्या वृत्तीचा आहे. आणि हो, यावर महिला आयोग काही करेल की नाही?'
दुसऱ्या एका ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी लिहिले की, "कृती आवश्यक आहे... सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का?" हे अत्यंत घृणास्पद आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवला. उर्फीने चित्राच्या पोलिस तक्रारीविरोधात अनेक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केल्या होत्या.