मुंबई बद्दल कंगना रनौत हिने केलेल्या विधानाशी सहमत नाही; भाजपच्या वतीने आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती
Ashish Shelar (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र (Maharashtra) यासंदर्भात अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) हिने केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आशिष शेलार यांनी हे मत मांडले. "कंगनाने मुंबई, मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनतेला शिकवण्याचा प्रयत्न करु नये. भारतीय जनता पक्ष कंगनाच्या या विधानाशी अजिबात सहमत नाही," असे सांगत आशिष शेलार यांनी भाजप पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा छडा लागण्यापूर्वीच जनतेची दिशाभूल करण्याचा काही राजकीय पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरु असलेली चौकशी आणि त्यातून समोर येणारी तथ्य यावरुन जनतेची दिशाभूल करण्यासाठी कंगना रनौतच्या मागे लपून भाजपवर टीका करण्याचा प्रयत्न करु नका, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सध्या ज्याप्रकराचे वातावरण आहे त्यात कंगना रनौत किंवा संजय राऊत यांनी शांततेचा भंग करु नये, असेही ते म्हणाले. दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगना हिच्या वक्तव्यानंतर भाजपवर निशाणा साधत माफी मागण्याची मागणी केली होती.

भाजप नेते राम कदम यांनी देखील कंगना रनौत हिच्या आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केले नाही आणि  करणार नसल्याचे ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र ती बड्या  नेते-अभिनेते ड्रग माफिया ची नावे  सांगण्याची तयारी दर्शवत आहे हेच महाराष्ट्र सरकारचं चिंतेचे भीतीचं कारण आहे? असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे.

Ram Kadam Tweet:

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना रनौत हिने बॉलिवूडमधील अनेक वादग्रस्त खुलासे करायला सुरुवात केली. यासाठी सोशल मीडियावर कंगना अधिकच अॅक्टीव्ह झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत पुन्हा परतू नको, अशी मला धमकी दिली आहे, असे ट्विटरवरुन सांगताना तिने मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केले. "यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” कंगनाच्या या व्यक्तव्यावर बॉलिवूड कलाकार, मराठी कलाकार, राजकीय नेते ते अगदी सर्वसामान्य यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली असून तिच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.