बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने हटके सिनेमांतून दमदार अभिनय करत आपली खास छाप सिनेसृष्टीत उमटवली आहे. अभिनयानंतर आता विद्या बालन हिने निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले आहे. 'नटखट' (Natkhat) या आगामी शॉर्ट फिल्मद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अलिकडेच विद्या बालन हिने या शॉर्ट फिल्मचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून ते चांगलेच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही विद्या बालन हिची पहिलीच शॉर्ट फिल्म आहे.
विद्या बालनने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ती एक सामान्य महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टरमध्ये विद्या एका लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ती काहीतरी विचार करताना पाहायला मिळत आहे. विद्या बालन हिने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, "एक गोष्ट ऐकाल? निर्माती आणि अभिनेत्रीच्या रुपात माझ्या पहिल्या शॉर्ट फिल्मची पहिली झलक सादर करत आहे." (कोरोना विरुद्धच्या लढ्यात विद्या बालन हिने निवडला मदतीचा अनोखा मार्ग; Tring सह भागीदारी करत 1000 PPE कीट्स केले दान)
विद्या बालन पोस्ट:
विद्याने शेअर केलेले हे पोस्टर प्रेक्षकांसह इतर कलाकारांनाही चांगलेच भावले आहे. यावर कमेंट्सचा वर्षाव होत असून विद्याचे कौतुक केले जात आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन शान व्यास यांनी केले असून रोनी स्क्रुवाला आणि विद्या बालन यांची ही निर्मिती आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसच्या संकट काळातही विद्या बालन हिने आपले योगदान दिले आहे. घरच्या घरी मास्क बनवण्याची सोपी पद्धत तिने चाहत्यांना व्हिडिओद्वारे दाखवली होती. तर 1000 पीपीई कीटस् आरोग्यसेवकांना दान केले. तसंच मदतीचा ओघ सुरु राहील असेही तिने पोस्टद्वारे स्पष्ट केले होते.