नसीरूद्दीन शाह यांची मुलगी हीबा शाहने क्लिनिकमध्ये केली मारहाण; वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल (Video)
हीबा शाह (संग्रहित संपादित प्रतिमा)

चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे गेले अनेक दिवस चर्चेत आहेत, मात्र आता त्यांची मुलगी हीबा शाहही (Heeba Shah), एका क्लिनिकमध्ये मारहाण केल्यामुळे चर्चेत आली आहे. हे प्रकरण 16 जानेवारीचे आहे, हीबा मांजरींच्या उपचारासाठी पशुवैद्यकीय क्लिनिकमध्ये गेली होती, जिथे उपचाराआधी एका कागदावर सही करायला सांगितले असता, तिला राग आला आणि तिने क्लिनिक कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले. इतकेच नाही तर त्यांना मारहाणदेखील केली.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी पशुवैद्यकीय दवाखान्यातील दोन कर्मचार्‍यांवर अत्याचार केल्याबद्दल, अभिनेत्री हीबा शहाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिड-डेने याबाबत वृत्त दिले आहे.

पहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीला वर्सोवाच्या वाइल्ड वुड पार्कमध्ये राहणारी, अभिनेत्री हीबा शहाची मैत्रीण सुप्रिया शर्माने पशुवैद्यकीय क्लिनिकमध्ये नसबंदीसाठी दोन मांजरींसाठी स्लॉट बुक केला होता. पण काही कारणास्तव ती जाऊ शकली नाही, म्हणून हीबा सुप्रियाऐवजी त्या ठिकाणी दोन्ही मांजरींना घेऊन गेली. क्लिनिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 16 जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास हीबा क्लिनिकमध्ये पोहचली. क्लिनिकमध्ये दुसरी एक शस्त्रक्रिया होत असल्याने, तिथल्या कर्मचार्‍यांने हीबाला 5 मिनिटे थांबण्यास सांगितले. मात्र अवघ्या 2-3 मिनिटांनंतर हीबा चिडली व तिथल्या लोकांना धमकावू लागली. (हेही वाचा: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने फॅशन डिझायनरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार)

त्यानंतर उपचार करण्यापूर्वी जेव्हा हीबाला एका कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले, तेव्हा ती आणखी चिडली आणि क्लिनिक कर्मचार्‍यांचा अपमान करू लागली. यानंतर, क्लिनिकमधील कर्मचार्‍यांनी हीबाला तिथून जाण्यास सांगितले, याच रागातून हीबाने  2 महिला कर्मचार्‍यांना मारहाण व शिवीगाळ केली तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करण्यास सुरवात केली. ही संपूर्ण घटना क्लिनिकमधल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, हे फुटेज वर्सोवा पोलिसांना देण्यात आले आहे. वर्सोवा पोलिसांनी कलम 323, 504 (हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत 17 जानेवारी रोजी एनसीची नोंद केली.