Mulshi Pattern remake (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) 2018 साली प्रदर्शित झाला होता. बघता बघता चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर बॉलीवूडची नजर अशा चित्रपटावर पडली नसेल यात नवल ते कोणते. तर या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक येऊ घातला आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षी सलमान हा चित्रपट बनवणार असल्याची बातमी आली होती, आता या हिंदी चित्रपटाचे नावदेखील निश्चित करण्यात आले आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचे नाव ‘धाक’ (Dhak) असणार आहे.

धाक या शब्दाचा हिंदी अर्थ म्हणजे, पॉवरफुल अथवा ताकदवान व्यक्ती असा होय. या चित्रपटात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आयुष शर्मा या चित्रपटाच्या गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे मूळ अधिकारही विकत घेतले आहेत. याआधी चित्रपटाचे नाव ‘मुळशी पॅटर्न’च ठेवले जाईल असा कयास बांधला गेला होता, मात्र आता या चित्रपटाच्या नावात बदल झाला आहे. मुख्य म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरी या चित्रपटाचे काम सुरु झाले आहे. (हेही वाचा: सलमान खान याच्या Coronavirus वरील 'प्यार करोना' गाण्याची झलक; संपूर्ण गाणे 20 एप्रिल रोजी चाहत्यांच्या भेटीला)

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठी चित्रपटाचे खास स्क्रीनिंग सलमान खान आणि अरबाझ खान यांच्यासाठी ठेवले होते. त्यानंतर सलमान खानने हा चित्रपट करण्यास होकार दिला. मूळ मराठी चित्रपटात उपेंद्र लिमये आणि ओम भूतकर अशी जोडी दिसली होती. आता या हिंदी चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय सलमान आणि आयुष आणखी एका चित्रपटात एकत्र येणार आहेत, तो म्हणजे ‘कभी ईद कभी दिवाली’. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून पूजा हेगडे सलमान खानच्या सोबत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 13 मे 2021 ठरवण्यात आली आहे.