Kangana Ranaut वर कारवाई करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची विधानसभा अध्यक्षांना लेखी विनंती; गृहमंत्र्यांना तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश
आमदार प्रताप सरनाईक व कंगना रनौत (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबई पोलिसांची (Mumbai Police) भीती वाटते अशा वक्यव्यासह मुंबईचा ‘पाकिस्तान व्याप्त काश्मीर’ (POK) असा उल्लेख करत कंगना रनौत (Kangana Ranaut) मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्या या आशयाच्या ट्वीटनंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली आहे. आता कंगना रनौतवर योग्य ती कारवाई करण्याची आमदार प्रताप सरनाईक( MLA Pratap Sarnaik) यांची विधानसभा अध्यक्षांना लेखी विनंती केली आहे. तसेच गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरनाईक यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

याआधी कंगनाने ‘इंडिअन एक्स्प्रेस’च्या बातमीचा हवाला देत म्हटले होते की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे आणि मला मुंबईला परत न येण्यास सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर ‘आझादी ग्राफीटी’ आणि त्यानंतर आता मला खुली धमकी, का मुंबई ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’सारखी भासत आहे?’ कंगनाच्या या ट्वीटनंतर तिच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

त्यावर प्रताप सरनाईक यांनीही ट्वीट करत म्हटले होते की, ‘उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.’ त्यानुसार आज त्यांनी कंगना रनौतवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली.

पहा प्रताप सरनाईक ट्वीट -

आता सरनाईक यांनी केलेल्या लेखी विनंतीमध्ये म्हटले आहे की, ‘कंगना राणावत यांनी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मिरशी केलेली असून मुंबई पोलिसांवर माझा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मुंबईत राहणे धोक्याचे आहे अशा पद्धतीचे ट्विट केले होते. त्याचबरोबर मुंबईची तुलना तालिबानबरोबर करण्याबाबतही टि्वट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये व प्रामुख्याने मुंबईमध्ये विविध राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी आपली प्रतिक्रिया देऊन कंगना राणौत यांच्यावर कारवाईची मागणी केली होती, परंतू अद्यापपपर्यंत कंगना राणावत यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली नाही.’

पुढे ते म्हणतात. ‘कंगनाने ट्वीटच्या माध्यमातून अनेकवेळा मुंबईची बदनामी केली आहे. अनेक कलाकारांवर अंमलीपदार्थ सेवनप्रकरणी आरोप केलेले आहेत. तसेच काही कलाकारांनी देखील कंगना यांच्यावर अंमली पदार्थ सेवनाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे या सभागृहातील सर्व सदस्यांनी या घटनेची तीव्र निंदा करुन सर्वानुमते कंगना राणावत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव पारीत करावा ही विनंती.’ (हेही वाचा: 'एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचे असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न, तिला मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरु करावेत'- अमेय खोपकर)

या लेखी विनंती नंतर गृहमंत्र्यांना तातडीने या प्रकारांच्या चौकशीचे आदेश देऊन24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.