#MeToo:तनुश्री दत्ता विरोधात राखी सावंत आक्रमक; मानहानीच्या दाव्यात मागितली चलनात नसलेली रक्कम
अभिनेत्री राखी सावंत आणि तनुश्री दत्ता (Photo Credits: Facebook)

#MeToo या मोहिमेतून सुरु झालेला तनुश्री दत्ता विरुद्ध राखी सावंत हा वाद काही थांबण्याची इतक्यात चिन्हे नाहीत. दोघींमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, राखी सावंत हिने तनुश्री दत्ताविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मात्र, या दाव्यात तिने भरपाई म्हणून तनुश्रीकडे मागितलेली रक्कम पाहून तुम्हालाही धक्का बसेल. राखीने तनुश्रीकडे केवळ २५ पैशांची नुकसान भरपाई मागितली आहे. विशेष असे की, भारतीय चलनातून २५ आणि ५० पैसे केव्हाच हद्दपार झाले आहेत. त्यामुळे द्यायची म्हटले तरी, ही रक्कम तनुश्रीला राखीला देताच येणार नाही. त्यामुळे राखीने चलनात नसलेली रक्कम कशाच्या जोरावर मागितली? या प्रश्नाचे उत्तर केवळ राखीलाच माहिती असावे.

'हॉर्न ऑके प्लीज' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत सेटवर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे. हा वाद सुरु असताना राखी सावंतनेही या वादात उडी घेत 'तनुश्री दत्ता ही खोटे बोलत आहे' अशी टीका राखीने केली. यातून हा वाद सुरु झाला. तनुश्री हे सगळे पैशासाठी करत असल्याचेही राखीने सांगितले होते. हे सर्व घडत असताना राखीने थेट पत्रकार परिषद घेत तनुश्रीवर गंभीर आरोप केले. यात तनुश्री दत्ता लेस्बियन आणि ड्रग अॅडिक्ट असून, तिने आपल्यावर बलात्कार केला, असे राखीने म्हटले होते. (हेही वाचा, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, मला जबरदस्तीने अंमली पदार्थांचे सेवन करायला भाग पाडले; राखी सावंतचा आरोप)

दरम्यान, राखी सावंतने आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. तिने तिच्या मेंदूवरही प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतली असल्याचा टोला तनुश्रीने राखीच्या आरोपावर पत्युत्तर देताना लगावला. दरम्यान, तनुश्रीने प्रत्युत्तर देताच राखीने तनुश्रीवर मानहानीचा दावा ठोका २५ पैसै भरपाई मागितली. आपण तनुश्रीकडे केवळ २५ पैसेच भरपाई मागितली कारण, तिची लायकीच तेवढी आहे, असे राखी म्हणते. तसेच, तनुश्रीच्या चुकांचा भुर्दंड तिच्या आईवडीलांनी का भरायचा म्हणूणच आपण २५ पैशांचा दावा दाखल केल्याचे राखी सांगते. दरम्यान, आपल्या देवानेच स्वप्नात येऊन मला हा मार्ग दाखवल्याचेही राखीने म्हटले आहे.