केंद्र सरकारच्या (Central Government) ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील सिनेमा हॉल (Cinema Halls) आणि मल्टिप्लेक्स (Multiplexes) 50 टक्के क्षमतेसह 15 ऑक्टोबरला पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. मात्र राज्यभरातील थीएटर पुन्हा कधी उघडणार याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून कोणतीही घोषणा झालेली नाही. मंगळवारी राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Cultural Affairs Minister Amit Deshmukh) यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये बोलताना सिनेमा मालक आणि प्रदर्शक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी आयएएनएसला सांगितले की, 'ही बैठक सकारात्मक होती आणि आम्ही मंत्र्यांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमे आणि मल्टिप्लेक्स त्वरित किंवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते लवकरच याबाबत निर्णय घेतील परंतु याबाबत निश्चित तारीख किंवा संकेत देण्यात आलेले नाहीत.'
सिनेमा व्यवसायाच्या दृष्टीकोनातून राज्याचे महत्त्व अधोरेखित करताना दातार पुढे म्हणाले, ‘मुंबई व महाराष्ट्र हे एक मोठे सर्किट आहे जिथून सरकार तसेच चित्रपटसृष्टी पैसे कमावते. मुंबई व महाराष्ट्रातून येणारा व्यवसाय सुमारे 30 ते 40 टक्के आहे. जोपर्यंत चित्रपटगृहे पुन्हा सुरू होत नाहीत तोपर्यंत वितरक चित्रपट प्रदर्शित करण्यास उत्सुक नाहीत, म्हणूनच महाराष्ट्र सरकारने चित्रपट उद्योगासाठी पुढाकार घेतला पाहिजे.’ (हेही वाचा: कोरोना व्हायरसचा Theatre Chain ला फटका; Cineworld, Picturehouse व Regal सिनेमाज होणार तात्पुरते बंद; 45,000 लोकांच्या नोकऱ्या धोक्यात)
दातार पुढे म्हणाले, ‘चित्रपटगृहे पुन्हा उघडल्यानंतर जवळपास दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीत नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरवात होईल. परंतु चित्रपटगृहे पुन्हा उघडल्याशिवाय चित्रपट देणार नाहीत असे निर्माते जेव्हा म्हणतात, तेव्हा ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. आम्ही थिएटर मालकांनी निर्णय घेतला आहे की, याक्षणी प्रदर्शनासाठी आम्हाला नवीन हिंदी चित्रपट मिळाले नाहीत, तर आम्ही दक्षिण चित्रपटांव्यतिरिक्त मराठी, बंगाली, भोजपुरी, पंजाबी आणि गुजराती अशा प्रादेशिक भाषांमधील चित्रपट तसेच आम्हाला परवडतील असे यापूर्वी रिलीज केलेले हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट प्रदर्शित करू. अशाप्रकारे आपण कमीत कमी व्यवसाय सुरू करू शकू व पुढे प्रेक्षकांच्या प्रतिसादानुसार आम्ही काम करू.'