सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूची (Coronavirus) लढा देत आहे. या काळात जवळजवळ प्रत्येक उद्योग क्षेत्राला आर्थिक समस्येचा सामना करावा लागला आहे. यामध्ये पर्यटन, हॉटेल, थिएटर या क्षेत्रांचे तर फार मोठे नुकसान झाले आहे. आता रीगल (Regal), सिनेवर्ल्ड (Cineworld) आणि पिक्चर हाऊस (Picturehouse) नावाने शेकडो चित्रपटगृहे चालविणारी कंपनी तात्पुरती बंद होणार आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 58 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. या ब्रँड्सचा मालक असलेल्या सिनेवर्ल्ड समूहाने म्हटले आहे की, आगामी जेम्स बाँड सीरिज सिनेमा पुढे ढकलल्यानंतर, ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांच्याकडे फार कमी ब्लॉकबस्टर चित्रपट होते.
कंपनीने सोमवारी सांगितले की, ते गुरुवारी यूएसमध्ये 536 रीगल सिनेमा आणि यूकेमध्ये 127 सिनेवर्ल्ड आणि पिक्चर हाऊस तात्पुरते बंद होणार आहेत. यामुळे सुमारे 45,000 लोकांच्या रोजगारावर संकट ओढवले आहे. न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठा बंद आहेत आणि त्यांच्या पुन्हा सुरू होण्यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक सूचना नाहीत. अशा परिस्थितीमध्ये प्रोडक्शन स्टुडिओ त्यांचे नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यास टाळाटाळ करत आहेत.
कंपनीने म्हटले आहे की, सध्या त्यांच्याकडे असलेल्या चित्रपटांच्या रिलीझशिवाय कोविड-19 नंतरच्या काळात ते ग्राहकांना थिएटरमध्ये येण्यास आकर्षित करू शकत नाहीत. सिनेवर्ल्डचे शेअर्स लंडनमध्ये 15.64 पाउंडपर्यंत घसरला आणि सकाळच्या व्यापारात 31 टक्क्यांनी घसरून 27.41 पौंड होता. कंपनीने सांगितले की, सिनेवर्ल्ड या परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवेल आणि या बाजारपेठांमध्ये योग्य वेळी बाजारपेठ सुरू करण्यासाठी भविष्यातील योजनांची माहिती देईल.
जेम्स बाँड सीरिजमधील सिनेमाकडून थिएटरला फार अपेक्षा होती. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती पाहता या चित्रपटाचे प्रदर्शन दोन वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट 2 एप्रिल 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.