Maharashtra Cinema Hall/Theaters Guidelines: 22 ऑक्टोबरपासून उघडणार राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे; सरकारने जारी केली नियमावली
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने याआधी 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमा हॉल (Cinema Hall) आणि नाट्यगृहे (Maharashtra Theaters) उघडण्याची परवानगी दिली होती, परंतु अजून यासाठी एसओपी जारी करण्यात आलेले नव्हते. यामुळे गेले कित्येक दिवस सिनेमा विश्वाशी संबंधित व्यापारी वर्ग अस्वस्थ होता, कारण एसओपीशिवाय चित्रपटगृहे उघडता येणार नव्हते. परंतु अखेर 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सरकारने एसओपी जारी केले आहेत. एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर.

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासाठी काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याअंतर्गत थिएटरच्या आत सामाजिक अंतरांची काळजी घेणे, फेस मास्क घालणे अनिवार्य असले पाहिजे आणि थिएटरमध्ये सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

चित्रपटगृहांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृहांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासह, त्यांना स्टॅगर शोच्या वेळेवर काम करण्यास सांगितले गेले आहे. एसओपीमध्ये असेही म्हटले आहे की प्रेक्षकांनी ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य द्यावे. सर्व सिनेमागृहांना प्रत्येक शो नंतर संपूर्ण सभागृह पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह, असे कर्मचारीच थिएटरमध्ये काम करू शकतील ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

एसओपीनुसार, प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे असेही सांगितले आहे. जर तुम्हाला सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात जायचे असेल, तर तुमचे लसीकरण झाले असणे गरजेचे आहे. थिएटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. (हेही वाचा: Maharashtra to Reopen Colleges: राज्यात दिवाळी नंतर कॉलेज पुन्हा खुली करण्याबाबत येत्या 2-4 दिवसात निर्णय होणार; उदय सामंत यांचे संकेत)

परंतु ज्यांना अद्याप लस मिळाली नाही, असे लोकही सिनेमागृहात प्रवेश करू शकतात. परंतु त्यांना त्यांच्या आरोग्य सेतू अॅपवर आपण स्वतः सुरक्षित स्थितीत असल्याचे दाखवावे लागेल.