Lok Sabha Elections 2019: 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर आज दिल्लीत करणार काँग्रेस प्रवेश
Umrila Matondkar (Photo Credits: Instagram)

सध्या देशभरात निवडणूकांचे नगारे वाजत आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यातच सेलिब्रेटींच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर (Umrila Matondkar) काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. आता मात्र जवळपास उर्मिलाचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. लवकरच ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश करेल.

पक्षप्रवेशानंतर उर्मिलाला मुंबईतून निवडणूकीची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तर मुंबईत काँग्रेसला अपेक्षित असलेला मराठमोळा आणि ग्लॅमरस चेहरा उर्मिलाच्या रुपात लाभला. आता उत्तर मुंबईतील भाजपचे गोपाळ शेट्टी या तगड्या उमेदवाराविरुद्ध उर्मिला मातोंडकर निवडणूकीला उभी राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर डान्सर सपना चौधरी हीचे ही नाव पुढे आले होते.

गेल्या काही काळापासून उर्मिला मातोंडकर सिनेमांपासून दूर असली तरी तिने अलिकडेच 'माधुरी' या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती.