Lawrence Bishnoi, Salman Khan (PC - Twitter/Instagram)

Lawrence Bishnoi Top 10 Targets: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) ने त्याच्या टॉप 10 टार्गेट लिस्टचा खुलासा केला आहे. या यादीत अभिनेता सलमान खान (Salman Khan) चे नाव आघाडीवर आहे. यासोबतच दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर शगुनप्रीत सिंगच्या नावाचाही समावेश आहे. या 10 जणांना संपवण्याची योजना त्याने आखली होती, अशी कबुली त्याने राष्ट्रीय तपास संस्थेसमोर (एनआयए) दिली आहे.

लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं की, 1998 मध्ये सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. बिष्णोई समाज काळवीटाला पवित्र मानतो. समाजाच्या दुखावलेल्या भावनांचा बदला घेण्यासाठी त्याला सलमान खानला मारायचे होते. बिश्नोईने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एनआयएसमोर कबुली दिली होती की, त्याच्या सूचनेनुसार त्याचा सहकारी संपत नेहरा याने सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाची तपासणी केली होती. मात्र, नेहराला हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली होती. (हेही वाचा - Sarath Babu Passed Away: दाक्षिणात्य दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

यावर्षी 11 एप्रिल रोजी सलमान खानला धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याच्यावर अभिनेत्याला धमकीचे ईमेल पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी सलमान खानशी संबंधित एक धमकीचे पत्रही मिळाले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा Y+ श्रेणीत वाढवली होती.

अभिनेता सलमान खानच्या कार्यालयाला धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गँगस्टरवर गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506 (2), 120(ब) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, बिश्नोईने आपल्या कबुलीजबाबात सांगितले की, सलमान खान व्यतिरिक्त तो दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर शगुनप्रीतलाही टार्गेट करत होता. शगुनप्रीत त्याच्या हिटलिस्टवर असल्याचे बिश्नोईने सांगितले. शगुनप्रीतवर विकी मिड्दुखेडाच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने दावा केला होता की, तिने विकी मिड्दुखेडाच्या हत्येचा बदला घेतला होता. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील विकास सिंग याने टोळीच्या कार्यकर्त्यांना नंतर आश्रय दिल्याची कबुली बिश्नोईने एनआयएसमोर दिली.