गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. त्यांनी आतापर्यंत 36 हून अधिक भाषेत गाणी गायली आहे. मात्र, 1963 मध्ये लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग ( Slow Poisoning) झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यावर हा विषप्रयोग कोणी केला? याबाबत त्यांना कळाले होते. परंतु, पुरावा नसल्याने त्यांनी त्या व्यक्तिविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
"ही खूप जुनी गोष्ट आहे. आम्ही कोणीही मंगेशकर कुटुंबीय त्या दिवसांबद्दल फार बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. मी थोडेथोडके नाहीतर, जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयावह होता की, मला उठून चालताही येत नव्हते. साहजिकच गाणे बंद होते. त्यावेळी लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाही, अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, त्या केवळ अफवा होत्या," अशा लता मंगेशकर म्हणाल्या आहेत. "मला अशक्तपणा आला होता, हे खरे आहे. पण मी गाऊच शकणार नाही, असे मला कुणीही सांगितले नव्हते. तशी शक्यताही नव्हती. त्यावेळी आमचे फॅमिली डॉक्टर होते आर.पी. कपूर. त्यांनी माझी खूपच काळजी घेतली. उलट मी कधी एकदा स्वत:च्या पायावर उभी राहते, असे त्यांना झाले होते. खरंतर त्यांचे आभार आहेत." असेही त्या म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Mirzapur 2 अभिनेता Priyanshu Painyuli गर्लफ्रेंड Vandana Joshi सोबत विवाहबद्ध (See Pics)
बॉलिवूड हंगामाचे ट्विट-
#LataMangeshkar for the first time the truth behind her slow poisoning@mangeshkarlata https://t.co/upDuu3gY4v
— BollyHungama (@Bollyhungama) November 27, 2020
दरम्यान, विषप्रयोग कोणी केला होता, असे विचारले असताना त्या म्हणाल्या की, माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळले होते. परंतु, त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही. कारण, आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचे आम्हाला नवल वाटले होते, असे लता मंगेशकर म्हणाल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसेच लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग करणारी नेमकी व्यक्ती कोण आहे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.