Lata Mangeshkar Birthday Special: लता मंगेशकर यांच्या संगीताच्या प्रवासाचा अभ्यास; लेखक अजय देशपांडे यांनी आज प्रकाशित केले ‘लता श्रुती संवाद’ पुस्तकाचे मुखपृष्ठ
लता मंगेशकर (संग्रहित संपादित प्रतिमा)

संगीत हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. संगीताशिवाय सर्वांचेच आयुष्य अपुरेच आहे. शास्त्रीय संगीत असो, लोकसंगीत असो किंवा हल्लीच्या नवनवीन संगीताचे प्रकार असोत, संगीतकार त्यांच्या व समाजाच्या भावना या माध्यमातून उत्तमरित्या सादर करीत असतो. या मधुर संगीताचा प्रेक्षकांच्या आयुष्यावर होणारा सुरेख असा परिणाम कोणीही नाकारू शकत नाही. यामध्येही अधोरेखित करण्यासारखे संगीत म्हणजे 20 व्या शतकात लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजात सादर झालेली गाणी.

यापूर्वी देखील लता मंगेशकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशोगाथा मांडणारी अनेक पुस्तके आली, पण आता पहिल्यांदाच त्यांच्या संगीताचा सखोल अभ्यास आपल्या समोर येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवरील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा लोकांवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारे, ‘कला संगम’ या पुस्तकाचे लेखक अजय देशपांडे यांनी यावेळी लता मंगेशकरांच्या गाण्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. या पुस्तकात लताजींच्या शास्त्रीय बंदिश, भजन, गीत, तराणा, दादरा, लॉरी, ठुमरी, मुजरा आणि गझल इत्यादींचा तसेच लतादीदींच्या संगीताच्या अनेक घटकांचा सखोल अभ्यास आहे. (हेही वाचा: लता मंगेशकर 'भारताची गानकोकिळा' होण्यापूर्वीच्या त्यांच्या आयुष्यातील जाणून घ्या या 5 खास गोष्टी!)

आज लतादीदींच्या 91 व्या वाढदिवस निमित्त अजय यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदर्शित केले आहे आणि लवकरच लता श्रुती संवाद हे पुस्तक देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, लहान वयातच वडीलांचे छत्र हरवल्याने आईसह 4 भावंडांची जबाबदारी असलेल्या लता मंगेशकर यांना पार्श्वगायनाची संधी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. 1942 साली किती हसाल साठी पार्श्वगायन करण्यासाठी पहिली संधी मिळाली होती मात्र सिनेमातून ते गाणे वगळण्यात आले. पुढे लता दीदींचे  'महल' सिनेमातील 'आएगा आनेवाला' हे गाणे लोकांना प्रचंड आवडले आणि दिली रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या.