बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे खूप निराश आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडून अभिनेता आणि निर्मात्यांना खूप आशा होत्या. मात्र, हा चित्रपट त्याच्या अपेक्षेप्रमाणे कमाई करण्यात यशस्वी ठरला नाही. बॉलिवूडचा एक अतिशय महत्वाकांक्षी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. एका मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 60 कोटीच्या वरही कमाई केली नाही. या चित्रपटामुळे निर्मात्यांना 100 कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
परंतु रिपोर्ट्स नुसार, तोट्याचा सौदा ठरलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी अभिनेता आमिर खान देवदूत म्हणून समोर आला. चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेत्याने आता चित्रपटाचे निर्माणे वायकॉम 18 स्टुडिओचे थोडे नुकसान भरून काढण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या हवाल्याने बॉलिवूड हंगामामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिरने आता त्याची या चित्रपटाची अभिनयाची फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आमिरला 100 कोटींचे नुकसान होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानसोबत व्हायकॉम 18 स्टुडिओने केली होती.
आमिर आणि वायकॉम 18 या चित्रपटात सुरुवातीपासून एकत्र काम करत होते. वायाकॉमने आमिरला 'फॉरेस्ट गंप'चे रिमेकचे हक्क 180 कोटी रुपयांना खरेदी करण्यास मदत केली. दोन्ही टीम मिळून हा चित्रपट तयार करत होत्या. वृत्तानुसार, एका जवळच्या सूत्राने सांगितले की, ‘जर आमिर खानने त्याची अभिनय फी घेतली तर वायकॉम 18 स्टुडिओचे सुमारे 100 कोटी रुपयांचे नुकसान होईल. अशा परिस्थितीत आमिरने हे नुकसान स्वतःच सहन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने त्याची फी माफ केली तर, निर्मात्यांना किरकोळ नुकसान होणार आहे. लाल सिंग चड्ढाच्या फ्लॉपची संपूर्ण जबाबदारी आमिरने स्वतःवर घेतली आहे. (हेही वाचा: Ram Gopal Varma ने सांगितले Box office वर चित्रपटांच्या अपयशाचे कारण, म्हणाले...)
सूत्रांनी पुढे सांगितले, ‘आमिरने चित्रपटाला चार वर्षे दिली, या चार वर्षात त्याने एक पैसाही कमावला नाही. लालसिंग चड्ढासाठी त्याची फी 100 कोटींच्या वर आहे, पण अपयशाची जबाबदारी स्वत: स्वीकारत त्याने ही फी माफ करण्याचे ठरवले आहे.’ रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर, अभिनेत्री मोना सिंग आणि दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्य देखील दिसले होते. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक होता.