गीतकार Javed Akhtar यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी Kangana Ranaut ला पोलिसांनी बजावला समन्स; 22 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश
Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेले अनेक दिवस विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. काही काळापूर्वीच तिने शेतकरी चळवळीला विरोध करत पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझशी ‘पंगा’ घेतला होता, तर सध्या तिच्या ट्वीटर खात्यावरून वाद सुरु आहे. अशात गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगनाविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत अभिनेत्रीला समन्स बजावला असल्याची माहिती मिळत आहे. जुहू पोलिसांनी 22 जानेवारी रोजी कंगनाला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कंगनाच्या विरोधात अंधेरी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता.

कंगना रनौतने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या गोष्टी नमूद केल्याचा आरोप केला जात आहे. जावेद अख्तर यांनी कोर्टाला कंगनाने बोललेल्या भागाचे रेकॉर्डिंगही ऐकवले. डिसेंबर 2020 मध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे व 16 जानेवारी रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 16 जानेवारी रोजी पोलिसांनी तपासाचा अहवाल सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला, त्यानंतर कोर्टाने हा अहवाल 1 फेब्रुवारीपर्यंत देण्यास मुदतवाढ दिली.

गीतकार अख्तर यांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, ‘एका वाहिनीला चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रनौतने माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पण्यांमुळे मला मानसिक त्रास होत आहे. सुशांत प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. मात्र तरी कंगनाने माझ्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले आहे. म्हणून, भारतीय दंड संहितेचे कलम 499 आणि 500 अन्वये रनौतवर खटला चालविण्याचे निर्देश दिले जावेत.’ (हेही वाचा: Tandav Controversy: 'तांडव' वेब सीरिजबाबतचा वाद चिघळला; निर्माते आणि अभिनेत्यांविरोधात मुंबईमध्ये FIR दाखल)

दरम्यान, देशद्रोहाच्या प्रकरणात मुंबईच्या वांद्रे पोलिसांनीही कंगना रनौतची चौकशी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस चौकशीनंतर कंगना म्हणाली होती की तिला मुद्दाम त्रास दिला जात आहे.