Emergency faces protests in Punjab (फोटो सौजन्य - X/ANI,Instagram)

Kangana Ranaut Film Emergency Banned In Punjab: कंगना राणौत (Kangana Ranaut) च्या 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच पंजाबच्या अनेक भागात निदर्शने करण्यात आली. यापूर्वी, एसजीपीसी (शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती) ने सरकारला चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती केली होती. इतकेच नाही तर पंजाबमधील अनेक चित्रपटगृहांबाहेर चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. 'इमर्जन्सी' हा चित्रपट कंगना राणौतचा दिग्दर्शनातला पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 1975 मध्ये माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. दिग्दर्शनाव्यतिरिक्त, कंगनाने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.

चित्रपटावर बंदी घालण्यात मागणी -

'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीदरम्यान, पंजाबमधील चित्रपटगृहांबाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पंजाबमधील अमृतसरमधील पीव्हीआर सूरज चंद तारा सिनेमाबाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. ज्याला एसजीपीसीने तीव्र विरोध केला आहे. पंजाबमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे. (हेही वाचा -Devendra Fadnavis on Emergency Movie: मुख्यमंत्र्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाचे केले कौतुक, म्हणाले "चित्रपट सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक")

अनेकवेळा बदलण्यात आली प्रदर्शनाची तारीख -

'इमर्जन्सी' चित्रपट आधी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला मंजुरी न मिळाल्याने त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला त्यांच्या चित्रपटातील तीन दृश्ये कापण्यास सांगितले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. (हेही वाचा - (हेही वाचा  - Emergency: कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर 6 जानेवारीला होणार रिलीज; 17 जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये होणार प्रदर्शीत (Watch Video))

सिनेमा हॉलबाहेर सुरक्षेत वाढ -

दरम्यान, एएनआयला दिलेल्या निवेदनात, अमृतसरचे एसएचओ बलजिंदर सिंग औलख यांनी सांगितले की, इमर्जन्सी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याच्या एसजीपीसीच्या विनंतीनंतर येथे (सिनेमा हॉलमध्ये) सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आम्ही सिनेमा हॉलच्या व्यवस्थापकाशीही संपर्कात आहोत. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथे आहोत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात शीख समुदायाचे लोक रस्त्यावर निषेध करताना दिसत आहेत.

पंजाबमध्ये इमर्जन्सीवर बंदी - 

तथापी, एसपीजीसीचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट हरजिंदर सिंग धामी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे की, हा चित्रपट शीख समुदायाची बदनामी करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. 'इमर्जन्सी' मध्ये शिखांचे चुकीचे चित्रण करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे. या चित्रपटात शीख पात्रे, विशेषतः जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांची भूमिका चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे.