Inox Private Screenings: कोरोना विषाणू काळात 'आयनॉक्स'ची खास ऑफर; आता संपूर्ण चित्रपटगृह बुक करा फक्त 2999 रुपयांमध्ये, जाणून घ्या सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे सात महिने बंद असलेले सिनेमा हॉल आता हळूहळू सुरू होत आहेत. कडक मार्गदर्शक सूचनांद्वारे आता चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याचा मार्गही बदलला आहे. सभागृहात स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक अंतर यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. गेले काही महिने प्रेक्षकही सिनेमा हॉलपासून दूर फेले आहेत. अशा परिस्थितीत सिनेमा मालक प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात खेचण्यासाठी नवीन ऑफर्स आणत आहेत. आता आयनॉक्स मूव्हीजने (Inox Movies) ग्राहकांना पुन्हा थिएटरमध्ये आणण्यासाठी एक नवीन युक्ती योजली आहे.

आयनॉक्स मूव्हीजने खासगी स्क्रीनिंग (Private Screenings) सुरू केले आहे. कंपनीकडून एक ऑफर देण्यात आली आहे की, आता आपण आपले खाजगी थिएटर बुक करू शकता. आपण संपूर्ण थिएटर फक्त 2999 रुपयात बुक करू शकता आणि आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. या ऑफरमध्ये कमीतकमी दोन लोक असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त संख्या थिएटरच्या पूर्ण क्षमतेच्या 50 टक्के असेल. सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी आयनॉक्सने ही ऑफर आणली आहे.

प्रेक्षक त्यांची वेळ आणि आवडत्या दिवसानुसार बुकिंग करू शकतात. तसेच, एखादा नवीन चित्रपट पहायचा की जुना, हे आपण ठरवायाचे आहे. आयनॉक्सच्या ट्विटनुसार आपण खास स्क्रीनिंग बुक करून, आपल्या जवळच्या लोकांसोबत आपले खास प्रसंग साजरे करू शकता. आयनॉक्सचा दावा आहे की, हॉल पूर्णपणे  सुरक्षित आणि स्वच्छ असेल. आयनॉक्सचे संचालक सिद्धार्थ जैन यांच्या म्हणण्यानुसार, या ऑफरचा फायदा घेणारा संपूर्ण थिएटर बुक करू शकतो. (हेही वाचा: Laxmii: अक्षय कुमार याने चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर शेअर केले पोस्टर, कियारा अडवाणी हिचा सुद्धा झळकला जबरदस्त लूक)

कोविड-19 मुळे झालेल्या बदलानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले गेले आहे. आता प्रेक्षक सुरक्षिततेची चिंता न करता आपल्या कुटुंबियांसह किंवा मित्रांसह चित्रपटाचा आरामात आनंद घेऊ शकतात. थिएटरमध्ये केवळ आपण ज्यांना ओळखतो असे लोक असल्याने आपल्याला सामाजिक अंतराबद्दल चिंता वाटणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार देशभरातील आयनॉक्सच्या प्रत्येक थिएटरमध्ये खासगी स्क्रिनिंगची सुविधा असेल. बुकिंगसाठी कंपनीला tickets@inoxmovies.com वर मेल पाठवावा लागेल. या मेलमध्ये खासगी स्क्रीनिंगबद्दल पूर्ण माहिती द्यावी लागेल. आपल्याला कधी चित्रपट पहायचा आहे, कोणता चित्रपट पाहायचा आहे आणि किती लोक आहेत. त्यानंतर चित्रपटगृह सर्व काही अरेंज करेल.