Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री Shilpa Shetty ने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला मानहानीचा दावा; म्हणाली- 'माझी प्रतिमा खराब केली'
Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

सध्या पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणामुळे दिवसेंदिवस राज कुंद्रा आणि त्याची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्राबाबतच्या जवळजवळ प्रत्येक बातमीमध्ये शिल्पा शेट्टीचे नाव दिसत आहे. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 29 मिडिया व्यक्ती आणि मीडिया हाऊसविरोधात अश्लील चित्रपट प्रकरणात खोटी बातमीदारी करणे आणि आपली प्रतिमा खराब केल्याबाबत, मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

या प्रकरणात शिल्पाचा पती राज कुंद्रा आरोपी आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, उद्या या प्रकरणाची सुनावणी होईल. गुन्हे शाखेच्या पथकाने राज कुंद्राला सोमवारी, 19 जुलैला रात्री अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्सद्वारे ते प्रसारित केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम या प्रकरणात वेगाने तपासात गुंतली आहे. 27 जुलै रोजी राज कुंद्राला न्यायालयीन कोठडीत 14 दिवस तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

कुंद्राने जामीन अर्ज दाखल केला होता पण कोर्टाने बुधवारी तो फेटाळला. मंगळवारी मुंबई हायकोर्टानेही त्याला तत्काळ तात्पुरती सवलत देण्यास नकार दिला. पोलिसांनी दावा केला आहे की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आले आहे की कुंद्राने आर्म्सप्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी तयार केली आहे. या कंपनीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लंडनस्थित केनरीन प्रायव्हेट लिमिटेड मार्फत हॉटशॉट्स अ‍ॅप खरेदी केले. (हेही वाचा: शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी फसवणूकीविरोधात पोलिसात दाखल केली तक्रार)

गेल्या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या काळात हॉटशॉट्सच्या माध्यमातून कुंद्राने 1.17 कोटी रुपयांची कमाई केली असा आरोपही यात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यादरम्यान 51 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याचा दावा केला आहे.