हैदराबाद बलात्कार प्रकरण: अक्षय कुमार, विजय देवरकोंडा, अनूप सोनी, फरहान अख्तर या बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
(PC - IANS and instagram)

हैदराबादमध्ये शुक्रवारी पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकण्याचा प्रकार घडला. 27 वर्षीय महिला डॉक्टरचा अर्धवट जळालेला मृतदेह हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर शाहनगर येथे आढळून आला होता. पीडित महिला रात्री दुचाकीवरून घरी जात असताना तिची दुचाकी पंक्चर झाली होती. त्यानंतर आरोपींनी तिला एकटीला पाहून मदत करण्याची तयारी दर्शवली. परंतु, या नराधमांनी तिला दूर नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या लाजिरवाण्या कृत्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पीडितेवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजातील प्रत्येक नागरिकाकडून होत आहे. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या घटनेचा निषेध नोंदवला असून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा- हैदराबाद: महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर जीवंत जाळल्याने देशभरातून संतापाची लाट)

आताचे हैदराबादची प्रकरण असो किंवा रांचीच्या लॉच्या विद्यार्थिनीसोबत झालेला गँगरेप असो. या सर्व घटनांमुळे समाज हादरून निघत आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या निर्भया केसला 7 वर्ष होऊन गेली. परंतु, अद्यापही लोकांची नैतिकता बदलेली नाही. आता देशात कडक नियम आणि कायद्यांची गरज निर्माण झाली आहे. हे सर्व बंद व्हायला हवं, अशा शब्दांत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

माझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा मैत्रिणीला असुरक्षित वाटत असेल तेव्हा मला त्यांच्याशी फोनवर बोलत राहावं लागतं. आपल्यापैकी अनेकजण असं करत असणार. ही सर्वांत भीतीदायक गोष्ट आहे. चुकीच्या वर्तणुकीविरोधात आवाज उठवायला शिका. जे माणसासारखे वागू शकत नाहीत त्यांचा मानवी हक्कांवर अधिकार नाही. आपला जीव सर्वांत महत्त्वाचा आहे. पोलिसांना फोन करण्यास कचरु नका. अडचणीत असाल तेव्हा 100/112 या नंबरवर कॉल करा, असं दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने म्हटलं आहे.

आम्ही पुन्हा एक मुलगी, बहीण आणि मैत्रीण गमावली आहे. अशा अपराधासाठी मृत्युदंडच मिळायला हवा. जोपर्यंत कठोर शिक्षा मिळणार नाही, तोपर्यंत आपण सुधारणार नाही, असं क्राइम पेट्रोलचा सूत्रसंचालक अनूप सोनी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनेता फरहान अख्तरने आपल्या ट्विटर हँडलवरून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यात त्याने म्हटलं आहे की, अशा घटनांमध्ये न्याय न मिळाल्याने आरोपी असे कृत्य करण्याचे धाडस करतात. त्यामुळे आपल्या समाजाला आपणच असुरक्षित केलं आहे. या दुःखद घटनेत मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे, असंही फरहान अख्तर यांनी सांगितलं आहे.