Kangana Ranaut, Hrithik Roshan (Photo Credits: Instagram)

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या ईमेल प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाची चौकशी सुरू आहे. हृतिक रोशन याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी केली जात आहे. दरम्यान, क्राइम इंटेलिजेंस युनिटने आता अभिनेता हृतिक रोशनला समन्स बजावला आहे. या प्रकरणात हृतिक रोशनला चौकशीसाठी समन्स पाठवला असून, त्याचे निवेदन नोंदवण्यासाठी 27 फेब्रुवारीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागासमोर हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा समन्स 2016 च्या प्रकरणाशी संबंधित आहे. हे प्रकरण दोन महिन्यांपूर्वी सीआययूकडे वर्ग करण्यात आले होते. त्या प्रकरणातील तक्रारदार देखील हृतिक रोशन आहे. कंगना रनौतशी निगडीत या केसचा तपास यापूर्वी सायबर पोलिस स्टेशन करत होते. हृतिक रोशनने 5 वर्षांपूर्वी अज्ञात लोकांविरूद्ध आयपीसीच्या कलम 419 आणि आयए कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. कंगना रनौतशी संबंधित हा वाद यानंतर कित्येक महिने चर्चेत होता. दोघांनीही एकमेकांना अनेक कायदेशीर नोटीस पाठवल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात कंगनाचे निवेदन नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे.

2013 ते 2014 दरम्यान हृतिक रोशनला जवळजवळ 100 ईमेल मिळाले होते. चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतच्या मेल आयडीवरून हे ईमेल पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनतर हृतिक रोशनने याबाबत तक्रार दाखल केली होती. प्रख्यात वकील महेश जेठमलानी यांनी याच संदर्भात डिसेंबर 2020 मध्ये मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले होते की, अद्याप या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे प्रकरण सायबर सेलमधून सीआययूकडे वर्ग केले. (हेही वाचा: Sunny Leone हिचा पती डेनियल वेबर याच्या कारचा क्रमांक वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक)

दरम्यान, सुरुवातीपासूनच हृतिक रोशनने कंगनासोबतचे नाते नाकारले आहे. मात्र, कंगना रनौतने तिच्या बर्‍याच मुलाखतींमध्ये असा दावा केला आहे की ती आणि हृतिक रोशन रिलेशनशिपमध्ये होते. हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांनी 2010 मध्ये मध्ये ‘काइट्स’ आणि 2013 मध्ये ‘क्रिश’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.