गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek)यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. त्यात कृष्णा अभिषेक गोविंदा कपिल शर्मा च्या शो मध्ये येणार असल्याकारणाने आपण तो एपिसोड करणार नाही असे सांगितले होते. त्यामागचे कारण सांगत गोविंदा आणि त्याच्या पत्नीवर बोट दाखवले होते. यावर चिची ने म्हणजेच गोविंदाने चुप्पी साधली होती. मात्र कृष्णा आपल्यावर केलेल्या चुकीच्या आणि बदनामीकारक विधानामुळे गोविंदा प्रचंड नाराज झाला आहे आणि त्यानेही आता या सर्वांमागील सत्य जगासमोर आणले असून आपले मौन सोडले आहे.
आपण या प्रकरणाबाबत खूपच मौन बाळगले होते. मात्र सत्य माहिती नसताना उगाचच कुणावर आरोप करणे चुकीचे आहे. त्यामुळे सत्य सर्वांना माहित असणे गरजेचे आहे असे सांगत गोविंदाने कृष्णाच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. गोविंदाने दिलेल्या मुलाखतीत याबाबत विधान केले आहे.
हेदेखील वाचा- Krushna Abhishek आणि त्याचा मामा Govinda च्या नात्यात आला दुरावा, विनोदी कलाकाराने घेतला 'हा' मोठा निर्णय
काय म्हणाला गोविंदा?
माझ्यामुळे कृष्णाने कपिलच्या शो मध्ये परफॉर्म केलं नाही असे त्याने सांगितले त्याचबरोबर आमच्या नात्यावरही भाष्य केले. त्याचे विधान अतिशय चुकीचे आणि एखाद्याची प्रतिमा मलीन करण्याचे होते. कृष्णा आणि माझे तो लहान असल्यापासूनच खूप चांगले संबंध आहेत. मग मला कळत नाही हे सर्व सार्वजनिकरित्या बोलून त्याला काय मिळालं. कृष्णाने आपला मामा गोविंदा आपल्या मुलांना बघण्यासाठी हॉस्पिटलला आला नाही असे विधान केले होते. त्यावर गोविंदा म्हणाला आम्ही त्याच्या जुळ्या मुलांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलो होतो मात्र त्याच्या पत्नी घरातल्या कोणालाही सरोगसीद्वारा झालेली जुळी मुले दाखवून नये असे तेथील कर्मचा-यांना सांगितले होते. आम्ही तिच्या डॉक्टरांना आणि नर्सेसला सुद्धा भेटलो होतो. अखेर आम्हाला लांबूनच मुलांना पाहून जड अंत:करणाने घरी परतावे लागले. खरं वाटतं नसेल तर हॉस्पिटलला जाऊन याबाबत शहानिशा करावी असे गोविंदाने सांगितले.
इतकच नव्हे तर कृष्णा त्यानंतर आपल्या मुलांसह आणि बहिण आरतीसह माझ्या घरी देखील आला होता. मात्र कृष्णा बहुधा हे विसरून गेला असेल. कृष्णा आणि कश्मिरा कडून वारंवार त्यांना बदनाम करणारे विधान केले जात आहे. जे अत्यंत चुकीचे आहे असे गोविंदाचे म्हणणे आहे. त्यामुळे मी स्वत: आता त्याच्यापासून अंतर ठेवू इच्छितो. त्यासाठी जो कुणी त्याला नापसंत करत आहे त्यांनी करत राहावे. प्रत्येक कुटूंबात असे वादविवाद, गैरसमज असतात. मात्र ते असे मिडियामध्ये बोलल्याने इमेज खराब होते. त्यामुळे कदाचित मी जास्त चुकीचा माणूस आहे असा लोकांना वाटत असेल. असो, माझी स्वर्गीय आई सांगायची, चांगले काम करत राहा आणि बाकी सगळं सोडून दे. मी तेवढचं करत आहे. असंही गोविंदाने सांगितले.