दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटाने सिनेजगतात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटगृहांमधून बाहेर आल्यानंतर जेव्हा हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला, तेव्हा तेथेही तो अनेक आठवडे अव्वल राहिला. या चित्रपटाला प्रेक्षकांसोबत समीक्षकांचीही दाद मिळाली. या चित्रपटाला नुकताच हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार 2022 चा दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता ऑस्कर पुरस्कार विजेता ध्वनी अभियंता रेसुल पुकुट्टी (Resul Pookutty) याने 'आरआरआर'बद्दल एक टिप्पणी केली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल ठरत आहे. रेसुलने राजामौली यांच्या आरआरआरला 'गे लव्ह स्टोरी' (Gay Love Story) म्हटले आहे.
रेसुलने या चित्रपटाबद्दल एकामागून एक ट्विट केले, ज्यामध्ये त्याने चित्रपटाला 'गे लव्ह स्टोरी' तसेच आलिया भट्ट चित्रपटातील एक प्रॉप असल्याचे म्हटले आहे. 'आरआरआर'मध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. रविवारी अभिनेता-लेखक मुनीष भारद्वाज यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी आरआरआरला 'कचरा' असे संबोधले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना रेसुलने लिहिले– 'गे लव्ह स्टोरी.' दुसर्या कमेंटमध्ये तो लिहितो, 'आणि आलिया भट्ट चित्रपटातील प्रॉप सारखी आहे.’
आरआरआरवरील टिप्पणीसाठी रेसुलवर जोरदार टीका होत आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर आता त्याने यावर स्पष्टीकरणही दिले आहे. तो म्हणाला की, पाश्चात्य देशांतील लोक या चित्रपटाबाबत जे म्हणतात ते मी उद्धृत केले आहे. नेटफ्लिक्सवर आरआरआर रिलीज झाल्यानंतर पाश्चात्य प्रेक्षकांनी या चित्रपटाला गे रोमान्स म्हटले आहे. या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील केमिस्ट्री त्यांना आवडल्याचेही प्रेक्षकांनी सांगितले होते. (हेही वाचा: या लोकप्रिय बॉलीवूड स्टार्सनी स्क्रीनवर दिले बोल्ड किसिंग सीन, रोमँटिक किसिंग व्हिडिओने उडवली खळबळ, पाहा व्हिडीओ)
दरम्यान, रेसुल पुकुट्टी हा साऊंड डिझायनर आहे. त्याने 'ब्लॅक', 'सावरिया', 'एंथिरन', 'रा वन', 'पुष्पा: द राइज' आणि 'राधे श्याम' यासह इतर चित्रपटांसाठी काम केले आहे. रेसुलने 2009 मध्ये 'स्लमडॉग मिलेनियर'साठी सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंगसाठी ऑस्कर जिंकला होता.