Gangubai Kathiawadi Controversy: गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचा वाद शिगेला पोहोचला; आमदारांसह रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
Gangubai Kathiawadi (PC -Facebook)

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मात्र चित्रपटाबाबत सुरु झालेले वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. कामाठीपुरा येथील रहिवाशांनी आलिया भट स्टारर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून त्यांच्या परिसराचे नाव वगळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटाने संपूर्ण परिसराला रेड लाइट एरिया म्हणून, तसेच तेथे राहणाऱ्या सर्व महिलांना वेश्या म्हणून बदनाम केले आहे. हायकोर्ट या याचिकेवर बुधवारी म्हणजेच उद्या सुनावणी करणार आहे.

काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी अमीन पटेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटात काठियावाडी समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच कामाठीपुरा हा रेड लाइट एरिया आहे, ज्याचे चित्रपटात चुकीचे चित्रण करण्यात आले आहे, असेही म्हटले आहे.

दुसरीकडे, निर्मात्यांनी पैशाच्या लालसेपोटी आपल्या कुटुंबाची बदनामी केली, असा गंगूबाई काठियावाडीच्या कुटुंबीयांचा दावा आहे. या चित्रपटात समाजसेविका असलेल्या गंगूबाई काठियावाडी यांना सेक्स वर्करच्या भूमिकेत दाखवण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणामुळे त्रस्त झालेल्या कुटुंबीयांनीदेखील न्यायालयात धाव घेतली आहे. (हेही वाचा: Aryan Khan Debut: शाहरुख खानचा मुलगा आर्यन लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, अभिनय नाही तर करणार हे काम)

दरम्यान, कामाठीपुरा येथील लोकांनी सांगितले की, कामाठीपुरा भागात 42 गल्ल्या आहेत जिथे 30 हजारांहून अधिक लोक राहतात. याठिकाणी अनेक अभियंते, पायलट, डॉक्टर राहतात. इथल्या फक्त 3 गल्ल्यांमध्ये सेक्स वर्कर राहतात. मात्र चित्रपटामध्ये संपूर्ण कामाठीपुरा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांची बदनामी होत आहे. सर्वात मोठी समस्या येथे राहणाऱ्या मुलांना भेडसावत आहे.