लोकप्रिय अभिनेत्री Shagufta Ali यांच्यावर आर्थिक संकट; आईचे उपचार करायलाही पैसे नाहीत, विकली कार व दागिने
Shagufta Ali (संग्रहित संपादित प्रतिमा)

गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीशी लढत आहे. या काळात भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, ज्याचा परिणाम जवळजवळ संपूर्ण आर्थिक बाबींवर झाला. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. मनोरंजन क्षेत्रावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. आता चित्रपट आणि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री शगुफ्ता अली (Shagufta Ali) यांनी आपली व्यथा मांडली आहे. गेल्या चार वर्षांपासून आपल्याला कोणतेही काम मिळालेले नसल्याने, आपण मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Spotboye च्या वृत्तानुसार, सध्याच्या परीस्थीमुळे अक्षरशः त्यांच्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर शगुफ्ताने यांनी असेही सांगितले की, आता त्या इतक्या लाचार झाल्या आहेत की त्यांना आपल्या म्हाताऱ्या आईचे उपचारही करता येत नाहीत. कामाचा अभाव आणि त्यात उद्भवलेल्या कोविड-19 मुळे शगुफ्ता यांची सर्व बचत संपली आहे. त्यांची परिस्थिती इतकी हालाखीची झाली आहे की, त्यांना आपली कार आणि दागिनेही विकावे लागले. त्यांनी आता आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.

यापूर्वीही शगुफ्ता यांना स्तनाचा कर्करोग झाला होता. त्यांना त्यासाठी 9 केमोथेरपी घ्याव्या लागल्या. आता त्या यातून बऱ्या झाल्या आहेत मात्र त्यांची घरची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्या पुढे म्हणतात. ‘माझ्या आईला वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे. तिला मधुमेह, संधिवात आहे. परिस्थिती इतकी खराब आहे की, मी तिला डॉक्टरकडे नेण्यासही असमर्थ आहे. माझ्या कुटुंबियांना माहिती असलेल्या डॉक्टरांशी फोनवर बोलून मी औषधे घेत आहे. मला मधुमेह आहे, ज्याचा परिणाम माझ्या पायांवर आणि डोळ्यावर होत आहे. त्याचाही उपचार करायचा आहे मात्र त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.’

सिंटा (CINTAA) संघटना केवळ विशिष्ट रकमेसह मदत करते, त्यामुळे आपण त्यांची मदत घेतली नसल्याचे शगुफ्ता यांनी सांगितले. त्यांनी सोनू सूदकडेही मदत मागितली, मात्र त्यांची संस्था आर्थिक खर्चासाठी मदत करत नाही. आपल्याला आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सिंटाचे वरिष्ठ सहसचिव अमित बहल म्हणाले की, आम्ही शगुफ्ता यांच्याशी चर्चा करू आणि त्यांना शक्य ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू. (हेही वाचा: Raju Sapte Suicide Case: राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी अजून एकाला अटक; अजूनही 4 जणांचा शोध सुरू)

दरम्यान, शगुफ्ता यांनी 36 वर्षांपूर्वी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आत्तापर्यंत 15 हून अधिक बॉलिवूड चित्रपट आणि सुमारे 20 टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.