शिबानी दांडेकर, जावेद व फरहान अख्तर आणि शबाना आझमी (संग्रहित संपादित प्रतिमा)

जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Farhan Akhtar And Shibani Dandekar) लग्नाच्या बंधनामध्ये अडकणार आहेत. हे दोघे यावर्षी लग्न करून, आपल्या नात्याला नवीन नाव देण्याचा विचार करीत असल्याचे जवळच्या सूत्रांकडून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने यावर्षी लग्न करण्याची तयारी केली आहे. आपला आगामी ‘तूफान’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, वर्षाच्या अखेरीस फरहान लग्न करण्याचा विचार करत आहे. अद्याप या दोघांनी कोणतीही तारीख निश्चित केली नाही, परंतु फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या खास दिवसाची तयारी सुरू केली आहे.

फरहान अख्तरचे वडील आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. शिबानी दांडेकर हिच्याशी लग्नाबाबत फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर म्हणाले की, 'माझ्या मुलाने याविषयी मला काहीच सांगितले नाही. मी त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर त्याच्यासोबत होतो, मात्र त्याने अजूनतरी मला याची कल्पना दिली नाही. पण तुम्हाला माहिती आहे, मुले खूप काही लपवतात. जर असे काही असेल तर तो लवकरच ही गोष्ट आम्हाला सांगेल.' तसेच 'शिबानीला मी अनेकवेळा भेटलो आहे, खूपच गोड मुलगी आहे ती' असेही ते म्हणाले.

(हेही वाचा: Toofan च्या शूटिंग वेळी Farhan Akhtar च्या हाताला झाले फ्रॅक्चर; Instagram वर फोटो केला शेयर)

दरम्यान, या फरहान आणि शिबानीच सुंदर बॉन्डिंग पाहून दोघेही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडप्यात समाविष्ट आहेत. मात्र लग्नाच्या या वृत्तावर अद्याप फरहान किंवा शिबानी दांडेकर या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 2000 मध्ये फरहानने अधुनाशी लग्न केले होते. हे लग्न 6 वर्षानंतर संपुष्टात आले आणि दोघे घटस्फोट घेऊन विभक्त झाले. फरहानला आधीच्या पत्नीपासून दोन मुले आहेत.