Dilip Kumar With Brother Ahsan and Aslam (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे जगभरात दहशत पसरली आहे. दररोज हजारो लोक या विषाणूला बळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर बरेच जण या विषाणूमुळे मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलेब्सपासून अगदी सामान्य जनतेपर्यंत लोक अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, बातमी मिळत आहे की दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या दोन्ही भावांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर दोघांनाही मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 97 वर्षीय दिलीपकुमार यांचे दोन भाऊ अहसान खान (Ehsaan Khan) आणि अस्लम खान (Aslam Khan) यांना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शनिवारी रात्री मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिवारी रात्री या दोघांचीही ऑक्सिजनची पातळी कमी होती. दोन्ही भावांवर उपचार करत असलेले डॉक्टर जलील पारकर यांनी माध्यमांना सांगितले. ‘दोन्ही भावांना बाय-पॅप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे आणि दोघे सध्या आयसीयूमध्ये आहेत. दोघेही खूप म्हातारे आहेत आणि दोघांनाही आधीपासूनच रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार आहेत. अशा परिस्थितीत दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, परंतु याक्षणी ते स्थिर आहेत.’

वृत्तानुसार दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो म्हणाल्या. ‘काळजी करण्याची काही गोष्ट नाही. अहसान आणि अस्लम दोघेही लवकरच बरे होतील व घरी परततील. डॉ.जलील पारकर आणि डॉ. निखिल गोखले हे त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि दोघेही खूप सक्षम डॉक्टर आहेत.’ त्याचबरोबर आपले पती दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी त्या म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या प्रार्थनामुळे ते बरे आहेत आणि घरी आराम करत आहेत.’ (हेही वाचा: प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती खालावल्याने आयसीयूमध्ये दाखल)

दरम्यान, याआधी इंडस्ट्रीमधील अनेक सेलेब्जना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी मिळाली होती. महत्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासह कुतुक्बाटेल चौघांना कोरोनाची लागण झाली होती. यातून सुखरूप बरे होऊन ते घरी परतले आहेत.