दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या जीवनावर एक चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे नाव ‘न्याय’ असे असून त्याचा टीजरही प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘न्याय’ चित्रपटावर रोख लावण्यात यावी अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सुशांतच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, सुशांत प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे आणि अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा खटल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
याचिकेत असेही म्हटले आहे की, सुशांतच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणत्याही चित्रपटामुळे प्रकरणावर परिणाम होऊ शकतो. यामुळे लोकांचा समज बदलू शकेल. जर चित्रपटात काहीही चुकीचे दर्शविले गेले असेल तर, लोकांचे या प्रकरणाबाबत विचार बदलतील. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि अद्याप त्याचा तपास पूर्ण झालेला नाही. या याचिकेत असेही म्हटले आहे की, ‘चित्रपट निर्माते परिस्थितीचा फायदा घेत आहेत आणि आपली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या संधीचे भांडवल करण्याचा प्रयत्न करीत आहेत’.
[BREAKING] Father of Sushant Singh Rajput moves Delhi High Court against movies depicting late actor's personal life@aditi2118 reports#SushanthSinghRajput #SSR #DelhiHighCourt #SushantSinghRajputhttps://t.co/rZrdoU1LqD
— Bar & Bench (@barandbench) April 20, 2021
त्यानंतर न्यायमूर्ती मनोजकुमार ओहरी यांनी चित्रपट निर्मात्यांना नोटीस बजावली असून, या याचिकेवर 24 मे पर्यंत त्यांचा प्रतिसाद मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मे रोजी होणार आहे. याचिकेत ‘न्याय: द जस्टिस’, ‘सुसाइड या मर्डर: अ स्टार वॉज लॉस्ट’, ‘शशांक’ यासारख्या चित्रपटांचा उल्लेख करण्यात आला आहे. सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी असेही म्हटले आहे की, हे चित्रपट बनविणार्या कोणत्याही चित्रपट निर्मात्याने त्यांच्याकडून परवानगी घेतली नाही.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला आहे. एनसीबी सुशांतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणातही चौकशी करत आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला अटक केली होती. दोघेही आता जामिनावर सुटले आहेत.