Dabangg 3 Saiee Manjrekar First Look: दबंग 3 मधून डेब्यू करत आहे महेश मांजरेकर यांची मुलगी; सलमान खानने शेअर केला फर्स्ट लुक
Meet Saiee Manjrekar as Khushi in Dabangg 3 (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’ (Dabangg 3) बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून दबंग 3 चे अनेक पोस्टर्स आणि टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सलमान खानने अजून एक पोस्टर आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे, जो मराठी लोकांसाठी एक ट्रीट ठरणार आहे. दबंग 3 च्या माध्यमातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर (Saiee Manjrekar) चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करीत आहे. आज सलमान खानने सई मांजरेकरचा या चित्रपटातील फर्स्ट लुक शेअर केला आहे.

सई मांजरेकर ही महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी. जेव्हा सई दबंग 3 मध्ये झळकणार असल्याची बातमी आली, तेव्हापासून तिच्या लुकबद्दल चर्चा रंगत आहेत. आता यावरून पडदा उठला आहे. सलमानने स्वतः सोशल मिडीयावर सईचा लुक शेअर केला आहे. सईचा लुक शेअर करताना सलमानने ‘Hamari pure innocent masoom Khushi’ असे कॅप्शन दिले आहे. सई ‘दबंग ३’ चित्रपटात सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सलमानने सईसोबत एण्ट्री घेतली होती. त्यावेळी सईच्या सौंदर्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. (हेही वाचा: IIFA 2019 च्या ग्रीन कार्पेटवर सलमान खान सोबत महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकरची एंट्री; ‘दबंग 3’ सिनेमात दिसणार एकत्र)

याआधी बिग बॉस मराठी 2 मध्ये जेव्हा सलमान खान आला होता, तेव्हाही त्याने सई आणि तिच्या दबंग 3 मधून होणाऱ्या डेब्यूवर भाष्य केले होते. दरम्यान उद्या, 23 ऑक्टोबर रोजी दबंग 3 चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. मुंबईसह चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, जयपूर, कोलकाता, अहमदाबाद, इंदूर आणि लखनऊ इथे एकाच वेळी हा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे. याच चित्रपटामधून दक्षिणेचा सुपरस्टार सुदीप देखील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.