The Kashmir Files च्या नावाने WhatsApp वर चालू आहे फसवणूक; चुकूनही क्लिक करू नका 'अशा' लिंकवर, पोलिसांकडून अलर्ट जारी
The Kashmir Files (Photo Credit - YouTube)

सध्या देशभरात 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाची बरीच चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर तर प्रत्येकालाच हा चित्रपट बघायचा आहे. आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. अनेक ठिकाणी 'द काश्मीर फाइल्स'च्या मोफत डाउनलोड लिंक पाठवून फसवणूक (Cyber Crime) केल्याच्या घटना घडल्या आहेत. नोएडा पोलिसांनी याबाबत लोकांना सतर्क केले आहे. नोएडा पोलिसांनी लोकांना या चित्रपटाशी संबंधित सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरील संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार मोफत चित्रपटांचे आमिष दाखवून लोकांना लिंक पाठवतात. लोकही अशा अमिषाला बळी पडतात आणि त्या लिंकवर क्लिक करतात. त्यानंतर हे गुन्हेगार वापरकर्त्यांचे फोन हॅक करून त्यांची बँक खाती रिकामे करू शकतात.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त (नोएडा) रणविजय सिंह यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली आहे की, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची लिंक शेअर केल्यानंतर सायबर गुन्हेगार असे मालवेअर व्हॉट्सअॅपवर पाठवू शकतात. अशाप्रकारे अवघ्या 24 तासांत 30 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी एका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्याला हे माहित नसते की त्यांचे डिव्हाइस रिमोट लोकेशनवरून हॅक झाले आहे. बँक खाती रिकामी झाल्याचे कळल्यावरच याबाबत खुलासा होतो.

गौतम बुद्ध नगर सायबर सेलचे अधिकारी बलजीत सिंग यांनी लोकांना कोणतीही ऑनलाइन फसवणूक किंवा त्याबाबत काही समस्या आढळल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन 1930 चा वापर करण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर नोएडा पोलिसांनी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीत झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पंजाबशी संबंध समोर आल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे. फसवणूक जिथून झाली, ती पंजाबमधीलच कुठलीतरी जागा असावी असा संशय आहे. सध्या सायबर तज्ज्ञांची टीम आणि राज्यांचे पोलीस पथक या प्रकरणांचा तपास करत आहेत. (हेही वाचा: Crime: हुंड्यासाठी नवविवाहित सुनेची हत्या, 4 जणांवर गुन्हा दाखल)

दरम्यान, कोणत्याही अनपेक्षित किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. सर्वसाधारण अशा लिंक्स एखादा चित्रपट, कार्यक्रम किंवा योजनेच्या नावाने असतात. अशा लिंकवर क्लिक केल्यावाव्र कदाचित तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात.