Rashmika Mandanna (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेत आहे, पण यावेळी ती तिच्या आगामी कोणत्याही प्रोजेक्टमुळे नाही तर, एका वादामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. अलिकडेच, काही वृत्तांत असा दावा करण्यात आला आहे की, रश्मिकाने बंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिला आणि या संदर्भात तिने राज्य आणि महोत्सव आयोजकांविरुद्ध आक्षेपार्ह विधाने केली. मात्र, रश्मिकाच्या जवळच्या एका सूत्राने आता हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस आमदार रवी गानिगा यांनी रश्मिकावर टीका केली होती. त्यांनी सांगितले होते की, अभिनेत्रीने बेंगळुरू येथील चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण नाकारले आहे.

गनिगा यांच्या मते, अभिनेत्रीने कर्नाटक चित्रपट उद्योगातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, तरीही तिने या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले आणि कर्नाटक तसेच कन्नड भाषेचा अनादर केला. त्यांच्या मते, या कार्यक्रमासाठी रश्मिकाला वारंवार बोलावण्यात आले होते, पण तिने वेळ नसल्याचे सांगून येण्यास नकार दिला. ते पुढे म्हणाले की,  माझ्या एका आमदार मित्राने तिला वारंवार निमंत्रण दिले, तिला फोन केला पण तिने कर्नाटकमध्ये येण्यास नकार दिला. त्यानंतर आमदारांनी सरकारला असे सुचवले की, त्यांनी रश्मिकाच्या कथित वर्तनामुळे तिच्या चित्रपटांना दिलेली सबसिडी मागे घेण्याचा विचार करावा.

आमदार रवी गानिगा यांची टीका- 

या आरोपांच्या फैरी झडत असताना, रश्मिकाच्या जवळच्या एका सूत्राने याबाबत स्पष्टीकरण देत एक निवेदन दिले आहे. न्यूज 24 मधील एका वृत्तानुसार, सूत्राने नमूद केले आहे की, रश्मिकावरील सर्व आरोप खोटे आहेत आणि त्यात कोणत्याही प्रकारची सत्यता नाही. रश्मिकाला कोणीतरी भेटायला आल्याची आणि तिने बेंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याची संपूर्ण कहाणी चुकीची आहे. परंतु दुसरीकडे, 4 रोजी, गनिगा म्हणाले की, त्यांच्याकडे रश्मिकाने निमंत्रण नाकारल्याचे पुरावे आहेत. (हेही वाचा: SC On Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शो सुरू करण्याची मिळाली परवानगी)

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘हे रश्मिकाचे विधान नाही तर रश्मिकाच्या टीमचे विधान आहे. आम्ही रश्मिकाला चित्रपट महोत्सवात (बेंगळुरू चित्रपट महोत्सव) आमंत्रित केले होते परंतु तिने नकार दिला होता याची कागदपत्रे (पुरावा) आम्ही सार्वजनिकरित्या जाहीर करू.’ 1 मार्च रोजी झालेल्या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात कन्नड चित्रपट उद्योगाच्या कमी उपस्थितीबद्दल, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. शिवकुमार यांनी कन्नड चित्रपट जगतासाठी या कार्यक्रमाचे महत्त्व उघड केले होते आणि कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.