Nitin Desai Death Case: प्रख्यात चित्रपट कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या एडलवाईस कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ अंतरिम दिलासा देणारा कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी नकार दिला. एफआयआरविरोधातील त्याच्या याचिकेवर 18 ऑगस्टला सुनावणी होईल, असे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती एन डब्ल्यू सांबरे आणि न्यायमूर्ती आर एन लड्ढा यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील तक्रारदार देसाई यांच्या पत्नीलाही नोटीस बजावली आहे.
एफआयआरमध्ये एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेसचे चेअरमन रेशेश शाह, एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज कुमार बन्सल आणि कंपनीच्या इतर दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी कंपनीच्या अधिकार्यांसाठी हजर राहून न्यायालयाला विनंती केली की, त्यांना कोणत्याही जबरदस्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण द्यावे आणि त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करावा. (हेही वाचा -स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बायोपिक वरील वादात मनसे चा अभिनेता Randeep Hooda ला थेट इशारा; पहा ट्वीट)
सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील एफआयआर गेल्या आठवड्यातच नोंदवण्यात आला असून अद्याप तपास सुरू आहे. त्यानंतर खंडपीठाने 18 ऑगस्ट रोजी याचिकांवर सुनावणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी न्यायालयाने सांगितले की, एक आठवडा थांबा. आम्ही 18 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी करू आणि मागितलेल्या अंतरिम आदेशांवर विचार करू.
दरम्यान, नितीन देसाई (वय, 57) हे 2 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे त्यांच्या स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. त्यांनी 'लगान' आणि 'जोधा अकबर' आणि टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' सारख्या चित्रपटांसाठी भव्य सेट डिझाइन केले आहेत. देसाई यांच्या पत्नीने 4 ऑगस्ट रोजी खालापूर पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यानंतर शहा आणि बन्सल यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.